गेल्या वर्षी ‘लालबागचा राजा’च्या पायावर महिला भाविकांचे माथे जबरदस्तीने टेकविणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा कित्ता यंदा येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी गिरविला आहे. रांग तोडून दर्शनासाठी जाणाऱ्या एका तरुणीला महिला पोलिसांनी इतकी बेदम मारहाण केली की त्याचे चित्रण दुपापर्यंत समाजमाध्यमावर फिरत होते. त्यातच मंडळात भाविकांना गणरायाचे दर्शन देण्यासाठी चाललेल्या गैरप्रकाराचे चित्रीकरण करणाऱ्या एका महिला पत्रकाराशीही पोलिसांनी असभ्य वर्तन करून तिच्यावर १२०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे, थेट मुख्यमंत्र्यांनीच महिला पोलिसांच्या या ‘दबंगगिरी’ची दखल घेत चौकशीचे आदेश द्यावे लागले.
मीरा रोडला राहणारी नंदिनी गोस्वामी ही आपल्या कुटुंबीयांसमोवत ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी आली होती. तिची आई अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या रांगेतून आत गेली. त्यापाठोपाठी नंदिनीनेसुद्धा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तिला तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या महिला पोलिसांनी अडवले. त्यातून तिची पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर महिला पोलिसांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे असणाऱ्या सौरव शर्मा नावाच्या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला.
या तरुणीला पोलिसांनी चौकीत आणले आणि तिच्यावर बाराशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली. मला पोलीस ठाण्यात नेऊन दांडुक्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, माझ्या वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप नंदिनीने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. पोलीस उपायुक्तांनी दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

चित्रीकरण नष्ट
याच दिवशी महिला पत्रकार पूनम अपराज ही परिचितांना आतमध्ये सोडत असल्याचे चित्रीकरण करीत होती. तितक्यात पोलिसांनी तिला अडवून तिचा मोबाइल काढून सर्व चित्रीकरण नष्ट केले. तिला दोन तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवून तिच्यावरदेखील १२०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. याप्रकरणी ‘महिला पत्रकार संघटने’ने दोषी पोलिसांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.