डॉ. महेन्द्र जगताप (राज्य कीटकशास्त्रज्ञ)
पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडय़ात सात वर्षांच्या मुलाला झिकाची बाधा झाल्याचे आढळले. यापूर्वी पुण्यामध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. झिका या विषाणूबाबत अधिक तपशीलवार माहिती समजून घेण्यासाठी राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेन्द्र जगताप यांच्याशी साधलेला हा संवाद.
झिका म्हणजे काय? याचा प्रसार कसा होतो?
झिका हा विषाणूजन्य आजार असून याची लागण एडिस जातीच्या डासापासून होते. झिका विषाणूचे अंश असलेला एडिस जातीचा डास मनुष्याला चावल्यास त्या व्यक्तीला झिकाची बाधा होते. याच डासापासून डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही प्रसार होतो. झिका हा विषाणू प्रथम १९४७ मध्ये युगांडा येथे माकडामध्ये आढळला. नंतर १९५२ मध्ये हा विषाणू मानवामध्ये आढळला. झिकाचा सर्वात मोठा उद्रेक प्रथम २००७ मध्ये याप बेटावर झाला होता. यानंतर अनेक देशांमध्ये या विषाणूचे उद्रेक झाल्याचे निदर्शनास आले आहे.
पालघरमध्ये झिकाची लागण झाल्याचे कोठे आणि कसे आढळले?
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई येथील आश्रमशाळेतील एका नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या शाळेतील अन्य विद्यार्थ्यांची तपासणी केली असता १३ विद्यार्थ्यांना ताप येत असल्याचे आढळले. त्यांना डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. यामधील सात जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती, तर सात वर्षांच्या मुलाला झिकाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात आढळले. राज्यातील ही दुसरी घटना असून यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाचे एक पथक राज्यात दाखल झाले होते. राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांसोबत या पथकाने नुकतीच पाहणी केली आहे.
या पाहणीमध्ये काय तपासणी केली गेली आणि काय आढळले?
समितीने डहाणूच्या रुग्णालयात दाखल असलेल्या १३ विद्यार्थ्यांची तपासणी केली. हे सर्व रुग्ण सध्या बरे आहेत. तसेच झाई आश्रमशाळेतील घरी सोडण्यात आलेल्या २१० विद्यार्थ्यांचीही तपासणी केली. मौजे झाई गावाच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरामध्ये गुजरात राज्याची सीमा येते. मृत बालकाने गुजरात राज्यातील डेहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरुवातीला उपचार घेतले होते. या आरोग्य केंद्राची पाहणी केली. या केंद्रामध्ये गोवाडा, डेहरी ही दोन गावे तीन किलोमीटरच्या पट्टय़ात येतात. या दोन्ही गावांमध्ये सर्वेक्षण करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत. मौजे झाई गावामध्येही समितीने भेट दिली. गावामध्ये २०६ मुले निवासी तर ३९ मुले ही घरून ये-जा करतात. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील साथीच्या आजारांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कृती कार्यक्रमही राबविण्यात आला आहे.
कृती कार्यक्रमामध्ये काय उपाययोजना केल्या गेल्या?
आश्रमशाळेलगतच्या तीन किलोमीटर परिसरातील बोर्डी, जांबुगाव, झाई, बोरिगाव, ब्रह्मागाव या गावांतील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तलासरी आणि डहाणू तालुक्यातून पाच गावांमधून आठ रक्तनमुने संकलित करून पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच गावातून डास अळींचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले आहेत. गावांमध्ये ९५ गर्भवती महिला असून यांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. गावामध्ये सर्वेक्षण करताना जवळपास ३५० पाण्याच्या टाक्यांमध्ये डासांच्या अळय़ा आढळून आल्या. या टाक्या स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच धूर फवारणी करणे, स्थलांतरित नागरिकांचा शोध घेणे, डासांच्या अळय़ा नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
झिकाची लक्षणे काय आहेत?
आजाराची लागण झाल्यापासून काहीच दिवसांमध्ये लक्षणे दिसून येतात. याची लक्षणे डेंग्यूसारखीच आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे आणि स्नायू दुखी, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे दिसून येतात. लक्षणे सौम्य स्वरूपाची असून दोन ते सात दिवस असतात. बाधा झालेल्या सर्वानाच लक्षणे दिसून येतात असे नाही. बाधा झालेल्या चार जणापैकी एका रुग्णाला लक्षणे दिसतात.
झिका हा आजार कितपत गंभीर आहे?
आजारामध्ये रुग्णालयात दाखल करण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु काळजी घेणे मात्र गरजेचे आहे. ताप आल्यास त्वरित जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रामध्ये उपचार घ्यावेत. कोणताही ताप अंगावर काढू नये. घरच्या घरी किंवा स्वत:हून उपचार घेणे टाळावे. या आजारासाठी निश्चित असा उपचार नाही. रुग्णांनी भरपूर विश्रांती, पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन आणि औषधोपचार घ्यावे. झिका विषाणूची लागण गरोदर मातेला झाल्यास पोटातील गर्भालाही याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर मातांनी या आजारापासून प्रतिबंध होण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रतिबंधासाठी काय काळजी घ्यावी?
गावातील पाणी साठे वाहते असावेत. पाण्याची भांडी वेळोवेळी रिकामी करून स्वच्छ करावीत. तसेच पाणी भरल्यानंतर त्यात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी कापडाने झाकून ठेवावीत. सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करणे शक्य नाही. अशा टाक्यांमध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनाशकाचा वापर करावा. गावातील किंवा घराजवळील पाणी साचून राहण्याची शक्यता असणाऱ्या टायर, रिकामे खोकी, करवंटय़ा इत्यादी निरुपयोगी वस्तूंचा नष्ट केल्यास डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होते. दुपारी आणि रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. एडिस जातीचा डास हा दिवसा चावत असल्यामुळे दिवसभर संपूर्ण अंग झाकले जाईल अशा कपडय़ांचा वापर करावा.
शैलजा तिवले