गांधीपुतळ्यावरून कॅन्डल मार्च निघाला

नागपूर : अक्षय बिंड आणि सागर सहस्त्रबुद्धे या दोघांचा क्रेझी कॅसलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला तीन दिवस लोटल्यावरही अद्याप पोलिसांनी कुणावरच गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी दोषींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी गांधी पुतळ्यावरून कॅन्डल मार्च काढला.

अक्षय आणि सागरचे नातेवाईक, मित्रांसह सर्वच पक्षाचे कार्यकर्ते बुधवारी सायंकाळी प्रथम गांधीपुतळा येथे गोळा झाले. येथून  कॅन्डल मार्च निघाला. बडकस चौक- कोतवाली पोलीस ठाणे- बडकस चौक होत पुन्हा गांधीपुतळ्यावर परतला. अक्षय आणि सागर हे बुडत असताना उपस्थितांनी मदत मागितल्यावरही क्रेझी कॅसल  प्रशासनाकडून ती दिली गेली नाही. आरडाओरड करून पाण्याची लाट बंद करण्यात आली नाही.

येथे प्रशासनाकडून सुरक्षेचे काहीही उपाय करण्यात आले नव्हते. त्यामुळे येथे नियुक्त केलेल्या कर्मचारी, व्यवस्थापक, मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मोर्चात मोठय़ा संख्येने तरुण, महिलांसह इतरही वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. न्याय न मिळाल्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. आंदोलनात दोन्ही तरुणांचे छायाचित्र, विविध मागणी करणारे फलक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. याप्रसंगी भाजपचे दयाशंकर तिवारीसह इतरही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्रेझी कॅसल व्यवस्थापनाकडून असहकार्य

क्रेझी कॅसलमध्ये रविवारी घडलेल्या अपघातात दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा व आवश्यक सुविधांचा अभाव, हा तरुणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशाने पोलिसांचा तपास सुरू असून त्याकरिता व्यवस्थापनाकडे कंपनीच्या संचालकांची नावे मागितली होती. मात्र, तीन दिवसांपासून पोलिसांना ही नावे सादर न करण्यात आल्याने शेवटी पोलिसांनी आता कंपनी निबंधक कार्यालयाला पत्र पाठवून हल्दीराम फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि. कंपनीच्या संचालक मंडळाची यादी मागिली आहे.