नागपूर : नेपाळमधील एका खेड्यात राहणाऱ्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांचा १४ वर्षीय मुलगा अनाथ झाला. भुकेने व्याकूळ झालेला हा मुलगा काठमांडूहून मजल दरमजल करत नागपूरमधील इतवारी रेल्वे स्थानकावर चार दिवसांपूर्वी पोचला लकडगंज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि शासकीय मदतीतून त्याची निवास आणि शिक्षणाची व्यवस्था करून दिली.

काठमांडूच्या पायथ्याशी एका खेडेगावात राहणाऱ्या मुरलीचे (बदललेले नाव) आईवडील सायकलने मजुरीला जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनीही मुरलीला आधार दिला नाही. त्यामुळे तो भुकेने व्याकूळ अवस्थेत काठमांडू रेल्वेस्थानकावर पोहचला. रेल्वेतून प्रवास करीत चार दिवसांपूर्वी नागपुरातील इतवारी रेल्वेस्थानकावर पोहचला. रात्री तो फलाटावर झोपलेला दिसल्याने दोन पोलिसांनी त्याला विचारणा केली. भूक लागल्याचे सांगताच एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचा जेवणाचा डबा दिला. दुसऱ्या दिवशी तो रेल्वेस्थानकाच्या बाजूच्या मैदानावर गेला. तेथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बघत होता. एकाने त्याला खेळण्यासाठी बोलावले. दिवसभर मैदानावर मुलांमध्ये मिसळला. पाच दिवसांपासून रात्री रेल्वे फलाटावर झोपणे आणि दिवसा मुलांसोबत मैदानावर खेळणे, अशी त्याची दिनचर्या सुरू होती.

आणखी वाचा-धक्कादायक! प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेच्या गर्भपिशवीत कापड…

एका मुलाला आली दया

मैदानावर खेळणाऱ्या एका मुलाने मुरलीला आईसक्रीम दिले आणि बोलते केले. तेव्हा त्याने अनाथ असल्याचे सांगितले. मुलाने ही माहिती आपल्या हॉटेल व्यवसायी असलेल्या वडिलांना दिली. दोघेही बापलेक मैदानावर गेले. मुलाने मुरलीला घरी नेण्यासाठी हट्ट धरला. त्यानेही होकार दिला. त्याला दोन दिवस घरी ठेवले. मात्र, कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी लकडगंजचे ठाणेदार वैभव जाधव यांना माहिती दिली.

जुलैपासून शाळेत जाणार

ठाणेदार वैभव जाधव यांनी मुरलीला नवीन कपडे दिले व बाल कल्याण समितीशी संपर्क साधला. कायदेशीररित्या शिक्षण आणि निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. आता नेपाळ ते नागपूरपर्यंत भटकणारा मुरली येत्या जुलैपासून शाळेत जाईल.