भाजयुमोचा निलंबित शहर उपाध्यक्ष कुख्यात गुंड सुमित राजकुमार ठाकूर याच्याविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे, अशी माहिती प्रा. मल्हारी मस्के यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
प्रा. मल्हारी मस्के हे काटोल मार्गावरील प्रेरणा कॉलनीत राहतात. त्यांच्या घराच्या मागील रस्त्यावर सुमित ठाकूर हा आपल्या परिवारासह राहतो. १६ सप्टेंबरला सुमित ठाकूरने घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या होंडा गाडीला धडक दिली. त्यानंतर त्याने प्रा. मस्के यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात प्रा. मस्के यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार दिल्याने २३ सप्टेंबर २०१५ला पहाटे ४ वाजताच्या सुमारास सुमित ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी प्रा. मस्के यांची बोलेरो कार जाळली. भाजयुमोचा पदाधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायामुळे प्रसारमाध्यमांनी प्रकरण उचलून धरले आणि नागपूर पोलिसांनी सुमित ठाकूरसह त्याच्या साथीदारांना अटक केली.
परंतु. या दरम्यान प्रा. मस्के यांनी सुमित ठाकूर आणि गुंड साथीदारांच्या भीतीमुळे आपल्या कुटुंबासह नागपूर सोडले होते. त्यानंतर १३ ऑक्टोबरला ते नागपुरात परतले असून त्यांनी आज सोमवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी सांगितले की, मी एलएडी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक विषयाचा प्राध्यापक आहे. आपले कुटुंब सुसंस्कृत आहे. कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. स्नेहल आणि कोमल या मुली एमबीबीएस अभ्यासक्रमाला आहेत. तर मुलगा अक्षय हा बारावीला आहे. अक्षयचे बारावीचे वर्ष असतानाही सुमित ठाकूरच्या भीतीमुळे आम्हाला नागपूर सोडावे लागले होते. चार पोलीस शिपाई तैनात असूनही आपल्या मनात आजही सुमित ठाकूरची दहशत आहे. परंतु त्याला अटक झाल्यानंतर हिंमत करून नागपुरात परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी लहान भाऊ अर्जुन आणि त्याची पत्नी सोबत आली आहे. तर मुलगा अक्षयचे बारावीचे वर्ग बुडू नये म्हणून त्याला अज्ञातस्थळी ठेवले आहे. आपण नागपुरात परत येताच सुमित ठाकूरचे काही साथीदार माझ्या मित्रांशी संपर्क करून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही ते म्हणाले. १६ सप्टेंबरला पहिल्यांदा घटना घडल्यानंतर सुमितने आपली माफी मागितली तर तक्रार मागे घेण्याची तयारी सुमितच्या वडिलाकडे दर्शवली होती. परंतु त्याच्या वडिलानी सुमितला माफी मागायला न लावता त्याच्या कृत्याचे समर्थन केले. त्यामुळे सुमितची हिंमत वाढली आणि त्याने दुसऱ्यांदा आपली गाडी जाळली. सुमितच्या पाठीमागे स्थानिक आमदारांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

केव्हातरी मरायचेच!
झोपडपट्टय़ांमध्ये कायमच गुंडांची दहशत असते. परंतु फ्रेन्ड्स कॉलनी, प्रेरणानगर ही सुसंस्कृत आणि उच्चभ्रूंची लोकवस्ती आहे. अशा वस्त्यांमध्ये कधीही अशाप्रकारची गुंडगिरी नसते. परंतु सुमित ठाकूरने आपल्या माध्यमातून या लोकवस्तीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या गुंडांना आज घाबरलो तर उद्या आपल्या डोक्यावर बसतील म्हणून ‘केव्हातरी मरायचेच आहे’ असा विचार करून लढण्याचा निर्धार केला, असे प्रा. मल्हारी मस्के यांनी सांगितले.