राम भाकरे

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ

दक्षिण नागपूरची जागा कायम ठेवण्यासाठी भाजप पक्षाचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना संधी देते की माजी आमदार मोहन मते यांना पुन्हा रिंगणात उतरवते, याबाबत कमालीची उत्सुकता  आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या मतांमघ्ये वाढ  झाल्याने काँग्रेसच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.

पूर्व आणि मध्य नागपूरच्या काही वस्त्यांचा समावेश असलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९९४ मध्ये अशोक वाडीभस्मे यांनी प्रथमच येथे कमळ फुलवले. त्यानंतर मोहन मते यांनी १९९९ मध्ये ही जागा राखली. मात्र, त्यानंतर २००४ व २००९ मध्ये येथून काँग्रेसचे दीनानाथ पडोळे विजयी झाले. २०१४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपने काँग्रेसकडून खेचून आणला. सुधाकर कोहळे ४३ हजार मतांनी विजयी झाले.

कोहळे पक्षाचे शहर अध्यक्ष होते, मात्र  आमदार म्हणून आणि संघटनात्मक पातळीवर त्यांच्या कामाचा विशेष ठसा उमटू शकला नाही. त्यामुळे पक्षात नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून नितीन गडकरी यांना १ लाख १५ हजार  मते मिळाली असली तरी ती २०१४ च्या तुलनेत ४३ हजारांनी कमी आहेत. उमेदवारी निश्चित करताना ही बाब लक्षात घेतली जाणार हे स्पष्ट आहे. याचा फटका कोहळे यांना बसू शकतो. दुसरीकडे या भागातील भाजपचे माजी आमदार मोहन मते यांनी दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याशिवाय देवेंद्र दस्तुरे, छोटू भोयर, सतीश होले, बळवंत जिचकार यांचीही नावे चर्चेत आहेत. उमेदवारी ठरवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शब्द अंतिम असणार आहे. कोहळे किंवा मते यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते, याची उत्सुकता आहे.

२००४ आणि २००९ अशा दोन सलग निवडणुका जिंकणाऱ्या काँग्रेसचा २०१४ मध्ये पराभव झाला असला तरी त्याची कारणे पक्षांतर्गत होती. तेव्हाचे विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांना उमेदवारी नाकारून पक्षाचे  पूर्व नागपुरातील नेते सतीश चतुर्वेदी यांना येथे उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज होऊन पडोळे राष्ट्रवादीकडून लढले. मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. यावेळी चित्र वेगळे आहे. लोकसभेच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये एकजुटीचे चित्र होते. सक्षम उमेदवार दिल्यास काँग्रेस येथे पुनरागमन करू शकते. सध्या काँग्रेसकडून विशाल मुतेमवार यांच्याशिवाय गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे यांची नावे चर्चेत आहेत. नाना पटोले यांची भूमिका उमेदवार ठरवताना निर्णायक असणार आहे.

या मतदारसंघात दलित मतांची संख्या लक्षणीय आहे. बहुजन समाज पक्षाची त्यावर पकड आहे. वंचितनेही यात मुसंडी मारली आहे. वंचितची नजर काँग्रेस, भाजपच्या नाराज उमेदवारांवर आहे. काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश घेणारे प्रमोद मानमोडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची घेतलेली भेट नव्या चर्चेला तोंड फोडणारी ठरली आहे.

सेनेचाही दावा

युतीत दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. या निवडणुकीत भाजपने ही जागाजिंकली. त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा कायम आहे. मात्र, सेनेनेही त्यांचा हक्क सोडलेला नाही.  सेनेचे किशोर कुमेरिया, किरण पांडव, शेखर सावरबांधे इच्छुक आहेत. कुमेरिया यांनी रेशीमबागेत कार्यालयही सुरू केले आहे.

विधानसभा निवडणूक – २०१४ (मिळालेली मते)

*    सुधाकर कोहळे (भाजप) ८१ हजार २२४

*    सतीश चतुर्वेदी (काँग्रेस)  ३८ हजार ०१०

*    सत्यभामा लोखंडे (बसपा)  २३ हजार १५६

*    किरण पांडव  (शिवसेना)   १३ हजार ८६३

लोकसभा निवडणूक – २०१९ (मिळालेली मते)

*    नितीन गडकरी (भाजप) १,३५,४५१

*    नाना पटोले (काँग्रेस) ६०,०७१