सत्र न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

हिंसक कारवाया करून सनसनाटी निर्माण करणे व लोकशाही व्यवस्था उलथवून टाकणे हाच दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी. एन. साईबाबा याचा उद्देश होता. असे त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेले दस्तावेज व भाषणातून स्पष्ट होते. चळवळीचा हेतू साध्य करण्यासाठी तो अनेक वर्षांपासून कार्य करीत होता, असे निरीक्षण प्रधान सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आपल्या आदेशात नोंदविले.

२८ ऑगस्ट २०१३ला पोलिसांनी अहेरीच्या बसस्थानकावरून हेम मिश्रा, महेश तिरकी आणि पांडू नरोटे या तिघांना अटक केली. त्या वेळी हेम मिश्राकडून १६ ‘जीबी’चा एक पेनड्राइव्ह सापडला. या पेनड्राइव्हमध्ये अनेक दस्तावेज  सांकेतिक स्वरूपात होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पेन ड्राइव्हचे सर्व दस्तावेज उघडून त्याच्या मिरर इमेज तयार करण्यात आल्या. त्यात गडचिरोलीतील जहाल नक्षली नर्मदाक्का, प्रकाश आणि इतरांसाठी अनेक संदेश होते. त्यानंतर काही दिवसांनी भूमिगत नक्षलवादी रामदार याला भेटण्यासाठी देवरी-चिचगड मार्गाने गडचिरोलीत दाखल होण्याच्या प्रयत्नातील प्रशांत राही व विजय तिरकी यांनाही गडचिरोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या दस्तावेजांचा पोलिसांनी अभ्यास केला असता त्या वेळी प्रथम दिल्ली विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक असलेला प्रा. जी. एन. साईबाबाचे नाव पोलिसांसमोर आले.  न्यायालयाच्या आदेशाने १२ सप्टेंबर २०१३ला प्रा. साईबाबाच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्या वेळी नक्षलवादाचा पुरस्कार करणारे, प्रचार व प्रसार करणारे अनेक दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. तर प्रा. साईबाबाच्या विविध ठिकाणच्या बैठका आणि भाषण रेकॉर्ड असलेली हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली. या सर्व दस्तावेजांचा अभ्यास केल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी जवळपास आठ महिन्यांनी म्हणजे ९ मे २०१४ला त्याला दिल्लीतील एका चौकातून अटक केली आणि गडचिरोलीत घेऊन आले.

न्यायालयात प्रा. साईबाबा आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध सरकारने अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि लेखी पुरावे सादर केले आणि न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून पाच जणांना जन्मठेप व एकाला दहा वष्रे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपींना शिक्षा ठोठावताना न्यायालयाने अनेक मुद्दय़ांना स्पर्श केला आहे. २००४ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी आरडीएफची स्थापना झाली आणि प्रा. साईबाबा हा संघटनेचा उपसचिव झाला. आरडीएफ या संघटनेवर आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यात बंदी घालण्यात आली असून सीपीआय (एम)ची आघाडी आहे, हे प्रा. साईबाबाच्या दस्तावेजातूनच स्पष्ट होते, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. सशस्त्र बंडखोरी आणि हिंसक कारवाया करून लोकशाही व्यवस्था उलथवून टाकणे, हाच साईबाबाचा उद्देश असल्याचे दिसते. त्यासाठी रेल्वे अपहरणापासून ते इतर हिंसक उपायही त्याने सुचविले आहेत. शिवाय दिवसेंदिवस जंगलाचे कमी होणारे प्रमाण आणि सरकारचे धोरण बघता शहरी भागात नक्षलवाद पसरविण्याचा मानस प्रा. साईबाबाने व्यक्त केला आहे. शिवाय हिंसाचाराच्या मूळ उद्देशाला बगल न देता २००८ पासून प्रा. जी. एन. साईबाबाने हेम मिश्रा, प्रशांत राही, महेश तिरकी, पांडू नरोटे आणि विजय तिर्की यांच्या मदतीने कट रचून गडचिरोलीत हिंसाचार घडविला. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून शेकडो निष्पापांचे बळी घेतला. पोलीस अधिकाऱ्यांचे जीव घेतले आणि प्रचंड नागरी संपत्ती नष्ट केली.

प्रा. साईबाबाला नैराश्य

प्रा. साईबाबाने बस्तरच्या जंगलात अनेक दिवस घालवले आहेत. तो अपंग असल्याने खाटेवर बसवून चार माणसे त्याला इतरत्र घेऊन जात होते. मात्र अपंग असल्याने जंगलात त्याचा उपयोग नव्हता. त्यामुळे केंद्रीय समितीने त्याचा वापर शहरी भागात नक्षलवादाचा प्रचार करण्यासाठी करण्याचा निर्णय १९९६च्या सुमारास घेतला. त्यानंतर तो दिल्ली राहू लागला. दिल्लीत अनेक ठिकाणी सभा, बैठका घेत होता. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या लोकांना भेटला. मात्र सुरुवातीला लोकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते आणि नैराश्यातूनच त्याने केंद्रीय समितीला अनेक पत्रेही लिहिली. त्यानंतर त्याची नियुक्ती दिल्ली विद्यापीठांतर्गत झाली आणि त्याच्याशी तरुणाई जुळत गेली. त्यानंतर चीन, रशीया, नेपाळ, भूतान आदी देशांमधून भारतातील माओवादाला मदत मिळविण्यासाठी विदेशी पाहुण्यांना जंगलातील नेत्यांशी भेट घालून देण्याचे काम करू लागला. यात यशस्वी झाला, असेही तपासात निष्पन्न झाले होते.

नक्षलवाद गडचिरोलीकरांच्या पाचवीला पूजलेला

२७ डिसेंबर २०१६ला एटापल्ली पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्हा आरोपींनी कट रचून घडविल्याचे स्पष्टपणे दिसत असून १९८२ला गडचिरोली जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यापासून आरोपींनी तेथे हिंसाचार घडवून अनेक निष्पापांचा बळी घेतला. त्यांच्या कारवायांमुळेच ६ ऑगस्ट २००२ला राज्य सरकारने संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषित केला. आज नक्षलवाद हा गडचिरोलीकरांच्या पाचवीला पूजलेला असून त्यामुळे विकास रखडला आहे. संपूर्ण जिल्हा पंगू झाला आहे. शरीराने ९० टक्के अपंग असतानाही केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने हे घडवून आणले. तो माओवादी चळवळीमागचा मेंदू असून कठोर शिक्षेस पात्र आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नमूद केले.