ऑईल, डिस्टेम्पर, प्लास्टिक ‘पेन्ट’ला पसंती 

दिवाळीनिमित्त घरोघरी रंगरंगोटी केली जाते. सणासुदीत वातावरण प्रफुल्लित राहावे, यासाठी दरवर्षी नागपूरकर घरांसह दरवाजे, खिडक्यांची रंगरंगोटी करतात. त्यामुळे हार्डवेअरच्या दुकानांनमध्ये रंग खरेदीसाठी गर्दी होत आहे. सध्या ऑईल, डिस्टेम्पर, प्लास्टिक आणि एक्स्टेरिअरच्या रंगांची चलती आहे. दिवाळीच्या कालावधीत सुमारे १४ कोटींच्या रंगांची उलाढाल नागपुरात होते.

शहरात छोटी-मोठी दीड हजारावर हार्डवेअरची दुकाने आहेत. घरांच्या दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात सिमेंट, रेती, गट्ट, चुना, पांढरे सिमेंट, पीओपी पावडर, खिळे खरेदी होत आहे. मात्र यामध्ये सर्वात जास्त मागणी रंगांची आहे. बाजारात नामांकित कंपन्यांच्या रंगांची सर्वात जास्त मागणी असून रंगांच्या प्रत्येक शेडचे असंख्य उपप्रकार आहेत.अनेक हार्डवेअरमध्ये संगणकाच्या मदतीने ग्राहकांना हवा तसा रंग मशीनद्वारे तयार करून दिला जात आहे. त्यासाठी प्रत्येक रंगाला एक विशिष्ट कोड दिला गेला आहे. आवडत्या रंगाचा कोड नंबर सांगितला की तो शेड आपल्याला तत्काळ उपलब्ध होतो. टेक्स्चर कलरने विविध डिझाईन्स करून घराच्या भिंतींना आकर्षक केले जाते. िभतींवर पीओपी पावडरच्या सहाय्याने विविध प्रकारचे टेक्स्चर देऊन त्यावर गदड किंवा हलका रंग देण्याची चलती आहे. प्लास्टिक रंगालाही ग्राहकांची मोठी मागणी आहे. हा रंग पाण्याने धुता येत असल्याने लहान मुले असलेल्या कुटुंबात या प्रकारच्या रंगांना पसंती असते. शिवाय प्लास्टिक रंग अनेक वर्षे टिकत असल्याने दरवर्षी घराला रंग देण्याची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर इमलशन, रॉयल टच, रॉयल प्ले, वेलवेट टच, वेदर शिल्डची मागणी जोरावर आहे. घराचे दरवाजे, खिडक्या, लोखंडी दाराला ऑईलपेंट लावण्यात येतो. मात्र हल्ली अ‍ॅल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाजे आल्याने ऑईल पेंटची मागणी दोन वर्षांपासून घटली आहे. बाजारात दोनशे ते पाचशे रुपये प्रतिलिटर ऑईलपेंट विकला जात आहे. सर्वात स्वस्त आणि मस्त रंग म्हणजे डिस्टेम्पर रंग. आजही त्याची मागणी सर्वात जास्त आहे. आर्थिकदृष्टय़ा परवडणारा आणि वर्षांनुवष्रे टिकणारा हा रंग आजही मध्यमवर्गीयांच्या आवडीचा आहे. सत्तर रुपये प्रतिलिटरप्रमाणे तो बाजारात उपलब्ध आहे. लस्टर कलर हा घराच्या बाहेरील भागासाठी आहे. यालाच एक्ससटेरिअर रंग देखील म्हणतात. नवीन घर बांधकामांसाठी या रंगाची निवड केली जाते. त्यामुळे याची मागणी इतर रंगांच्या तुलनेत केवळ वीस टक्के आहे. हा रंग वॉटरप्रूफ प्रकारातही मिळतो. यामध्ये धूळ बसू नये, यासाठी विशेष रसायन टाकण्यात आले आहे. २८० ते ३००  रुपये प्रतिलिटर मध्ये तो उपलब्ध आहे.

रंगांचे दर प्रतिलिटर

  • ट्रक्टर इमलशन – १३०-१५० रु.
  • रॉयल टच- ५०० रु.
  • रॉयल प्ले- ४६० रु.
  • वेलवेट टच- ४९० रु.
  • वेदर शिल्ड- ३५० रु.
  • ऑईल पेंट- २०० रु.