शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत नागपूर विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. नागपूर विधानभवनाच्या पायऱयांवर बसून राष्ट्रवादीचे नेते सरकारविरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. शेतकऱयांचे कर्जमाफ करण्याची विरोधकांची मागणी फडणवीस सरकारने फेटाळून लावल्याने विरोधक संतापले. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि पक्षाचे इतर महत्त्वाचे नेत्यांनी सहभाग घेत विधानभवनाबाहेर घोषणाबाजी केली आणि राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढेही आपली कैफियत मांडली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी या वर्षीही विरोधकांनी आक्रमकपणे मांडली होती. पण कर्जमाफीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी व त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या. मात्र, सरकारने ज्या उपाययोजना केल्या आहेत त्याचा शेतकऱयांना लाभ मिळण्यास भरपूर वेळ लागेल. तोपर्यंत त्यांना दिलासा मिळायला हवा. शेतकऱयांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे नेते आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या या आक्रमक भूमिकेमुळे सरकारसमोर कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.