पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या संचातून कमी क्षमतेने निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात लोकार्पण केलेल्या महानिर्मितीच्या कोराडी वीजनिर्मिती केंद्रातील तीनपैकी ६६० मेगावॅटचा संच क्रमांक १० गेल्या दोन दिवसांपासून बंद असून इतर दोन संचातून केवळ ६५ टक्केच वीजनिर्मिती होत आहे. एकीकडे वीज टंचाई असताना दुसरीकडे शनिवारी रात्रीपासून खापरखेडा केंद्रातीलही ५०० मेगावॅटचा संच तांत्रिक कारणाने बंद पडला आहे.

ऐन उन्हाळ्यात अचानक खासगी व महानिर्मितीचे काही वीजनिर्मिती संच बंद पडताच मागणीच्या तुलनेत निर्मिती कमी झाल्यामुळे राज्यात भारनियमन नसल्याचा ऊर्जा खात्याचा हा दावा फोल ठरला. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल २०१७ रोजी लोकार्पण केलेल्या कोराडीतील सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित संच (क्रमांक  १०) गेल्या दोन दिवसांपासून बॉयलरची टय़ूब गेल्यामुळे बंद आहे. त्याची दुरुस्ती सुरू असून तो सोमवापर्यंत कार्यान्वित होणार असल्याचे महानिर्मितीचे अधिकारी सांगत आहेत. संच क्रमांक ८ आणि ९ मधूनही केवळ ६५ टक्के क्षमतेनेच वीजनिर्मिती होत असून त्याचाही एकूण वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. खापरखेडा प्रकल्पातही शनिवारी रात्री अचानक ५०० मेगाव्ॉटचा संच बंद पडला आहे. दुरुस्तीला काही दिवस लागणार आहेत. कोराडी प्रकल्पातील संच क्रमांक ५ हा २५ वर्षांहून जुना असल्यामुळे बंद आहे तर संच क्रमांक ६ नूतनीकरणासाठी बंद करण्यात आला आहे, हे येथे उल्लेखनीय.

राज्यात रविवारी दुपापर्यंत कुठेही भारनियमन झाले नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत असले तरी विजेची मागणी वाढताच ते सुरू होण्याची शक्यता आहे.

वीज स्वस्त होणार कशी?

महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्रात सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित ६६० मेगाव्ॉटचा एक संच बंद असून इतर याच क्षमतेच्या दोन संचातूनही ४१३ व ४३५ मेगाव्ॉट निर्मिती होत आहे. प्रती युनिट केवळ २.५३ रुपये असे कमी दर असताना त्यातून पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन होत नसल्याने ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार कशी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.