यंत्रणा सज्ज, गणेशपेठ बसस्थानकावर उद्घाटन

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयात ‘शिवथाळी’ योजनेला रविवारी गणतंत्र दिनाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात सुरुवात होणार असून याच दिवशी नागपुरात पाच केंद्रावर ही शिवथाळी मिळणार आहे. गणेशपेठ बसस्थानक परिसरातील केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

गोरगरिबांसाठी सवलतीच्या दरात भोजन मिळावे म्हणून शिवसेनेने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दहा रुपयात शिवथाळी योजना जाहीर केली होती.

शुक्रवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या योजनेच्या तयारीचा आढावा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्य़ांच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून घेतला. नागपूरच्या तयारीची माहिती येथील जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली.

ही योजना राबवण्यासाठी यंत्रणा सज्ज असून रविवारी गणतंत्र दिनाचा मुख्य सोहोळा संपल्यावर पालकमंत्र्यांच्या हस्ते गणेशपेठ येथील शिवथाळी केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असे तायडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. नागपुरात पाच ठिकाणी हे केंद्र असणार आहे. त्यात गणेशपेठ बसस्थानक, डागा हॉस्पिटल, मातृसेवा संघ इस्पितळ महाल, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना बाजार व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रुग्णालय आदीचा समावेश आहे. या पाचही केंद्रांना भास्कर तायडे यांनी शुक्रवाही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

या योजनेत नागपूर शहराच्या वाटय़ाला ७५० थाळ्या येणार आहेत. गणेशपेठ केंद्रावर १५० तर इतर केंद्रावर ७५ थाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.  प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर त्याचे वाटप केले जाणार आहे.

शिवथाळी योजना राबवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अंमलबजावणीच्या दृष्टीने कामाचा आढावा घेण्यात आला आहे. रविवारी गणेशपेठ केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. – भास्कर तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, नागपूर