अमरावती : प्रेमप्रकरणात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने कट रचून मित्रांच्याच मदतीने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिलिंद सौदागर वाघ (४२) रा. अनंत विहार कॉलनी, शेगावनाका, अमरावती असे मृताचे नाव असून नांदगाव पेठ पोलिसांनी पत्‍नीसह तीन युवकांना अटक केली आहे. मिलिंद हे भारतीय सैन्‍यातून निवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये उदखेड येथे रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना सैन्‍याचे निवृत्‍ती वेतन व रेल्वेचा पगार सुरू होता. परंतु, काही महिन्यांपासून त्यांची पत्नी राहते घर व पेन्शन नावाने करून घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती. याच कारणांवरून वाद वाढल्याने त्यांची पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती. मृत मिलिंद हे त्यांचा लहान भाऊ प्रशांत सौदागर वाघ (३२) रा.न्यू तापडीया नगर, अकोला यांच्याशी नेहमी संपर्कात होते. त्यांना पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत ते सांगत होते.

हेही वाचा – धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीला पाण्याच्या टाकीत….

गेल्‍या १६ एप्रिलपासून मिलिंद यांचा फोन लागत नसल्याने प्रशांत वाघ हे अमरावतीत त्यांच्या घरी आले. सर्वत्र शोध घेऊन ते मिळून न आल्याने अखेर प्रशांत वाघ यांनी याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाडगेनगर पोलिसांनी मिलिंद यांची शोधमोहीम सुरू केली असता काही दिवसांपूर्वी नांदगावपेठ पोलिसांना कठोरा गांधी मार्गावरील राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आल्याचे कळले. प्रशांत यांनी मिलिंद यांचा मृतदेह ओळखला आणि त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तपासात हे हत्याकांड समोर आले.

हेही वाचा – ईडीने सुरू केला ताडोबा प्रकल्पातील १२ कोटींच्या घोटाळ्याचा तपास

आरोपी महिलेने घर, पेन्शन नावाने करून देण्यासाठी आणि त्यानंतर घटस्फोट देण्यासाठी मिलिंद वाघ यांच्यावर दबाव आणला. मिलिंद यांचे दुसऱ्या महिलेसोबत सुत जुळले असून ते तिच्या नावाने पेन्शन करून देतील, असा संशय आरोपी महिलेला होता. आरोपी शुभम, संकेत व कार्तिक हे तिघेही नेहमी मिलिंद यांच्यासोबत दारू पित होते. त्यामुळे पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा कट रचला. १८ एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले आणि त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला. या संपूर्ण बाबी तपासात उघड झाल्यानंतर नांदगावपेठ पोलिसांनी मिलिंद वाघ यांच्या आरोपी पत्नीसह शुभम देविदास भोयर (१९), रा.आम्रपाली, संकेत अशोकराव बोळे (२९), रा.आशियाड कॉलनी, कार्तिक मुरलीधर कडूकर (१९) रा. मार्बल लाईन, शेगाव नाका अमरावती यांना ताब्यात घेतले. अटक होताच आरोपींनी मिलिंद वाघ यांच्या हत्येची कबुली दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati murder of husband wife hatch plan with help of friends mma 73 ssb