भंडारा : नागझिरा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प रोडवरील जमनापूर येथील एका वसाहतीत अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तीन अज्ञात चोरांनी कपाटाची चाबी दिली नाही म्हणून घरातील एका ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेला टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकून दिले. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर पोलीस विभागाला फिर्यादीने कुठलीही तक्रार अधिकृतरित्या दिली नसून नागरिकांच्या सूचनेवरून साकोली पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यामुळे अनेक शंका कुशंकांना पेव फुटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जमनापूर येथील एका वसाहतीत एक कुटुंब भाड्याने राहते. पती-पत्नी आणि एक ४ वर्षाचा मुलगा असा त्यांचा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वी ३ आरोपींनी या घरी प्रवेश केला. यावेळी घरी ८ महिन्यांची गर्भवती महिला आणि ४ वर्षाचा मुलगा होता. चोरीच्या उद्देशाने आलेल्या ३ आरोपींनी कपाटाची किल्ली मागितली. पण महिलेने टाळाटाळ केल्याने सदर महिलेला टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. त्यावेळी ४ वर्षाचा मुलगा घरी झोपलेला होता तर पती नेहमीप्रमाणे कामाला गेला होता. महिलेने पाण्याच्या टाकीतून हात दाखवून आरडाओरोड केल्याने शेजारी धावून आले आणि महिलेला पाण्याच्या टाकीतून काढण्यात आले. यावेळी पाण्याची टाकी अर्धी होती.

हेही वाचा – भाजपा आमदाराला ६०० कोटींची जमीन १ रुपयांत; नागपूर महापालिकेचा अजब कारभार

हेही वाचा – एसटी बस दरीत कोसळता कोसळता वाचली! नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. परंतु फिर्यादीने याबाबत कुठलीही तक्रार न दिल्याने या प्रकरणाला संशयित वळण मिळालेले आहे. चोर खरेच आलेत का ? चोरांनी चोरी न करताच पळ कसा काय काढला ? आणि गर्भवती महिलेला पाण्याच्या टाकीत टाकून चोरांनी काय साध्य केले ? या घटनेमुळे परिसरात उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. महिलेच्या हाताला दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. साकोलीचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. अनोळखी तीन इसमांनी चेहऱ्याला मास्क बांधला असल्याची माहितीही समोर आली आहे.