दोन्ही मुलांचा ‘ब्राऊन शुगर’चा नाद सोडवल्याचे आई-बापाला समाधान

राज्य पोलिसांसाठी कपडे शिवण्याचे काम वामनराव आणि वंदना हे दाम्पत्य करीत असे. त्यामुळे पोलिसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक बडे अधिकारी घरीही येऊन गेले होते. त्यामुळे आपल्या मुलांनीही मोठेपणी पोलीस व्हावे आणि आपण शिवलेले कपडे घालावेत, असे स्वप्न या दोघांनी रंगविले होते. प्रत्यक्षात एके रात्री पोलीस अचानक घरी आले आणि मोठय़ा विपुलला मारामारी केल्याबद्दल त्यांनी ताब्यात घेतले तेव्हा प्रथम या दाम्पत्याला चिंता वाटली नाही, पण जेव्हा अंमली पदार्थाच्या नशेत त्याने ही मारहाण केल्याचे समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. विपुलपाठोपाठ दुसरा मुलगाही याच व्यसनाच्या जाळ्यात अडकल्याने मनानं ते पुरते खचले होते. आता ही दोन्ही मुलं व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकत असली, तरी या कुटुंबाच्या मनावरचे सावट पूर्णपणे मावळलले नाही.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार

पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या रात्री वामनराव आणि इतर कुटुंबीय घरात गाढ झोपी गेलेले असतानाच दार वाजले आणि अशा अवेळी पोलिसांना पाहून या दोघांना आश्चर्यच वाटले. पोलिसांच्या येण्याचे कारण उघड झाले आणि हे दोघे हबकले. अंमली पदार्थाच्या नशेत त्याने एकाला मारहाण केली होती.पोलीस विपुलला घेऊन गेले आणि त्याच क्षणी भविष्यातील संकटाचा या दोघांना अंदाज आला. त्या दिवसापासूनच मुलांना अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी या दाम्पत्याचा संघर्ष सुरू झाला. तब्बल पंधरा वर्षांच्या प्रयत्नांना अखेर दीड वर्षांपूर्वी त्याला यश आले. पण ही पंधरा वर्षे सोपी नव्हती.

वामनराव आणि वंदना या दाम्पत्याला तीन मुले आहेत. विपुल, कृष्णा आणि नीलेश अशी त्यांची नावे. वामनराव हे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोशाख शिवण्याचे काम करतात. स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या परेडसाठी लागणारा खास पोशाख शिवण्यात त्यांची राज्यभरात ख्याती आहे. त्यामुळे मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंतचे बहुतांश अधिकारी त्यांच्याकडे यायचे. त्यांच्या घराच्या भिंतीवर महाराष्ट्र पोलीस दलातील आजी-माजी पोलीस महासंचालकांसोबतची त्यांची छायाचित्रे त्यांच्या कामाची पावती देतात. पंधरा वर्षांपूर्वी विपुल हा चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला अकरावी व बारावीकरिता नामांकित शाळेत दाखल केले. बारावीत असतानाच  विपुलच्या स्वभावात बदल होत गेला. तो दिवसभर घराबाहेर राहू लागला. रात्री उशिरा घरी यायचा. विचारल्यावर चीडचीड करायचा. वामनराव व वंदनाला हा बदल संशयास्पद वाटला. एका रात्री वंदनाने त्याला गाठले असता त्याच्या तोंडातून दारू व सिगरेटचा दुर्गंध आला. तिने त्याला हटकले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी पोलीसच घरी थडकल्यावर आपल्या मुलाची व्यसनापायी झालेली घसरण या दोघांच्या प्रथम लक्षात आली.

काही दिवस तुरुंगात काढल्यावर विपुल जामिनावर बाहेर आला.  त्याने व्यसन सोडावे, यासाठी वंदना त्याला वारंवार विनवीत असे. मात्र वामनरावांचा उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू नये, यासाठी त्यांच्या नकळत त्याला व्यसनासाठी पैसेही देत असे. वस्तीतील मुलांच्या संगतीतच विपुलला हे व्यसन जडले होते आणि दिवसागणिक ते गंभीर वळण घेत होते. तोळाभर ब्राऊन शुगर घेण्यासाठी त्याला एक हजार रुपये हवे असत. ते मिळवण्यासाठी तो आईकडे हुज्जत घालत असे. घरातील वातावरण बिघडू नये म्हणून वंदना पतीला न सांगता मुलाला पैसे द्यायची. पैसे संपल्यानंतर विपुल दुचाकी, मोबाइल अशा वस्तू तारण ठेवायला लागला. मित्रांसोबत अंधारात लोकांना लुटण्यापर्यंत त्याची हिंमत वाढली. पोलिसांसोबत ओळख असल्याने वामनराव व वंदनाच्या कानावर या गोष्टी येऊ लागल्या. त्यामुळे मुलाला सुधारण्यासाठी मनावर दगड ठेवून ते पोलिसांच्या मदतीने त्याला तुरुंगात पाठवत होते. सहा महिने, वर्षभर तुरुंगात राहिल्यानंतर तो जामिनावर बाहेर यायचा. त्यानंतर त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायचे. मात्र, तेथून परतल्यानंतर पुन्हा  व्यसनाधीन व्हायचा.

मोठा मुलगा अंमली पदार्थाच्या आहारी गेला असल्याने इतर दोन मुलांबाबत  हे दाम्पत्य काळजी घेत होते. मात्र, विपुल तुरुंगात असताना त्याच्या मित्रांनी त्याचा लहान भाऊ नीलेशलाही आपल्या जाळ्यात ओढले. ही बाब कळताच वामनराव आणि वंदनावर जणू आभाळच कोसळले. बघताबघता संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली. तणावामुळे वंदनाची झोप उडाली. त्या झोपेच्या गोळया घेऊ लागल्या. मुलांना व्यसनमुक्त  करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न त्या करू लागल्या. नातेवाईकांमध्ये पुरती बदनामी झाली होती, ती वेगळीच. सार्वजनिक समारंभांमध्ये जाणे त्यांनी टाळले. तरीही हार न पत्करता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.

दीड वर्षांपूर्वी सतत चार दिवस विपुल घरीच होता. त्याला उजेडाची भीती वाटायची. त्यामुळे खोलीमध्ये सर्वत्र अंधार असायचा. त्याला इतरांची भीती वाटत असल्याने तो त्याच्या खाटेखाली शस्त्र ठेवू लागला. एक दिवस त्याला अपस्माराचा झटका येऊन तो बेशुद्ध पडला. चार दिवसांपासून अंमली पदार्थाचे सेवन न केल्याने त्याला हा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरूच ठेवले. आज विपुल अंमली पदार्थाच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर पडला आहे. फुटाळा तलाव परिसरात खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसायही त्याने सुरू केला आहे. मात्र लहान मुलगा नीलेश व्यसनाच्या पाशातून सुटलेला नव्हता. विपुलने त्याला व्यनसमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. मागील गणेशोत्सवादरम्यान वंदना व विपुल यांनी नीलेशवर नजर ठेवली. त्यालाही चार-पाच दिवस अंमली पदार्थ मिळाले नाहीत. त्यालाही विपुलप्रमाणे एक दिवस झटका आला. उपचारानंतर त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयात नेण्यात आले. डॉ. प्रवीण नवघरे यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर तेथे उपचार करण्यात आले. एक महिन्यानंतर तो घरी परतला तो व्यसनमुक्त होऊनच. मन:शांतीसाठी माहुरझरी येथील विपश्यना केंद्रात त्याने काही दिवस घालवले. आता वडिलांच्या शिलाई कामात तो मदत करतो आहे.

गेल्या पंधरा वर्षांत वामनराव व वंदनाची आर्थिक प्रगती खुंटून गेली होती, पण आता मुले व्यसनमुक्त झाल्याचे त्यांना समाधान आहे. घरात पुन्हा आनंद परतला आहे.

(ही घटना पूर्णपणे सत्य असून त्यातील सर्व नावे काल्पनिक  आहेत.)