वाशिम : मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेला बदल, घरातील कुलरमधील साचलेले पाणी, सांडपाणी व इतर कारणामुळे जिल्ह्यात डेंगू, चिकनगुणीयाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी २०२४ ते आजपर्यंत जिल्ह्यात १६१ संशयीतांची जिल्हा हिवताप पथकाकडून तपासणी केली असता ३८ जणांना डेंग्यूची तर ३६ जणांना चिकनगुणीयाची लक्षणे आढळून आली आहेत. पावसाळा तोंडावर असल्यामुळे साथरोगांचा धोका घोंगावत असून नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

डेंग्यू हा एक विषाणुजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती डासांच्या चावल्यामुळे तो प्रसारित होतो. हा डास जवळपास ४०० मीटरपर्यंत उडू शकतो. हिवताप हा संसर्गजन्य असून एनोफिलीस जातीचा बाधीत मासा डास चावल्यामुळे त्यामध्ये असलेल्या प्लाजमोडियम परजीवीमुळे होतो. मागील काही दिवसांपासून कधी डक्ड ऊन तर कधी पाऊस अशी परिस्थिती असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घरा घरात कुलर लावलेले आहेत. मात्र त्यामधील पाणी बदलले जात नसल्यामुळे अशा पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी अनेक गावात डेंग्यू व चिकनगुणीयाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांची जिल्हा हिवताप विभागाकडून शोध मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे कुणालाही तीव्र ताप, डोकेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास असेल, थंडी वाजत असेल, स्नायू आणि सांधे दुखत असतील, शरीर कमजोर वाटत असेल, भुक लागत नसेल, तहान लागत असेल आणि तोंडाला कोरडेपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या डॉक्टरांकडे जावून उपचार करुन घेण्याची गरज आहे. डेंग्यूचा आजार गंभीर असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. या दरम्यान जिल्हा हिवताप विभागाने गावोगावी जावून १६१ संशयीत रुग्णांची तपासणी केली असता जवळपास ३८ जणांना डेंग्यू तर ३६ जणांना चिकनगुणीयाची लक्षणे आढळून आली आहेत. पावसाळा तोंडावर असल्यामुळे साथरोगांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समित्यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असल्यामुळे नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – धक्कादायक! कामगारांना पिण्यासाठी पाणीच नाही; अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसीतील ४५० कामगारांचे हाल

प्रयोगशाळाच नसल्यामुळे होते अकोल्यात तपासणी

वाशिम जिल्हा स्वतंत्र होऊन बरेच वर्षे झाली तरी देखील जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळाच नाही. जिल्ह्यातील संशयीत रुग्णांची अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी होते. परिणामी रुग्णांचा अहवाल येण्यास विलंब होतो. अधिकाधिक रुग्णांची तपासणी होत नाही अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा – ताडोबात वाघ किती? बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात झालेल्या प्राणीगणनेत…

दुखणे अंगावर काढणे ठरेल धोकादायक!

सध्या जिल्ह्यात साथरोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच डेंग्यू, चिकनगुनीया आदी आजाराने अनेजण त्रस्त आहेत. मात्र बरेचदा किरकोळ सर्दी, ताप, डोकेदुखी उदभवल्यास त्याकडे नागरीकांकडून दुर्लक्ष केले जाते. मात्र डेंग्यू आजार धोकादायक असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या रुग्णालयात जावून उपचार करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप विभागाकडून करण्यात येत आहे.