अमरावती : नांदगावपेठच्‍या औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्‍या एका उद्योगाच्‍या व्‍यवस्‍थापनाने पाण्‍याची थकबाकी भरण्‍याची तयारी दर्शविल्‍यानंतरही महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्‍या आडमुठ्या धोरणामुळे पाणी पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. पाण्याअभावी या उद्योगात कार्यरत असलेल्‍या सुमारे ४५० कर्मचारी- कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत.

नांदगावपेठच्‍या वस्‍त्रोद्योग उद्यानातील (टेक्‍सटाईल पार्क) श्‍याम इंडोफॅब या कंपनीने सुमारे आठ वर्षांपूर्वी उद्योग स्‍थापन केला. आर्थिक अडचणींमुळे या कंपनीने उत्‍पादन थांबवले आहे. पण, अजूनही या उद्योगात सुमारे ४५० कर्मचारी आणि कामगार कार्यरत आहेत. हा उद्योग पुन्‍हा सुरू व्‍हावा आणि येथील कामगारांना न्‍याय मिळावा, यासाठी प्रयत्‍न सुरू करण्‍यात आले. विदर्भातील काही संस्‍थांनी त्‍यासाठी पुढाकार घेतला. दरम्‍यान कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापनाने पाण्‍याची थकबाकी भरण्‍याची तयारी दर्शविली. दंड म्‍हणून आकारलेली रक्‍कम ही अवास्‍तव असल्‍याने पाच हप्‍त्‍यांमध्‍ये ही रक्‍कम भरण्‍याची सवलत द्यावी, अशी मागणी एमआयडीसीच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांकडे करण्‍यात आली, पण त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले.

हेही वाचा – ताडोबात वाघ किती? बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात झालेल्या प्राणीगणनेत…

काही महिन्‍यांपूर्वी या उद्योगाचा पाणी पुरवठा बंद करण्‍यात आला. त्‍यामुळे या उद्योगात काम करीत असलेल्‍या कामगारांना पिण्‍याचे पाणी देखील बाहेरून विकत आणावे लागत आहे. बंद पडलेला हा उद्योग सुरू व्‍हावा, अशी कामगारांची अपेक्षा आहे. आधीच वीज आणि पाण्‍याचे वाढीव दर हे उद्योजकांसाठी अडचणीचे ठरले आहेत. येथील उद्योगांना सवलतीच्‍या दरात वीज आणि पाणी उपलब्‍ध झाले, तरच आजच्‍या स्‍पर्धेच्‍या जगात येथील उद्योगांचा टिकाव लागू शकतो, असे उद्योजकांचे म्‍हणणे आहे.

औद्योगिकदृष्‍ट्या मागासलेल्‍या म्‍हणून ओळख असलेल्‍या अमरावती शहरात टेक्‍सटाईल पार्कच्‍या माध्‍यमातून उद्योगाला चालना देण्‍याचे प्रयत्‍न सरकारी पातळीवर होत असताना एमआयडीसीच्‍या असहकार्यामुळे येथील उद्योजक त्रस्‍त आहेत. उत्‍पादन बंद झालेल्‍या एखाद्या उद्योगातील कामगारांना किमान पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून द्यावे, यासाठी एमआयडीसी प्रशासन हालचाली करायला तयार नाही. व्‍यवस्‍थापनाने दिलेल्‍या पत्रावर निर्णय घेत नाही. याविषयी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

हेही वाचा – पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं, तीन वर्षांच्या चिमुरड्याची प्रकृती गंभीर

एकीकडे, सरकार उद्योगांना प्रोत्‍साहन देत असताना एमआयडीसीच्‍या वरीष्‍ठ अधिकाऱ्यांची आडमुठी भूमिका ही नकारात्‍मक आहे. त्‍यामुळे येथील औद्योगिक वसाहतीला फटका बसू शकतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्‍या शरद पवार गटाचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रदीप राऊत यांनी व्‍यक्‍त केली आहे.

नांदगावपेठ येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना चालना मिळायला हवी. मात्र, एमआयडीसी प्रशासनाच्‍या असहकार्यामुळे उद्योगांसमोरील अडचणी वाढल्‍या आहेत. येथील उद्योग बंद पाडण्‍यासाठी वरिष्‍ठ अधिकारी काम करीत आहेत का, अशी शंका येते. – अॅड. यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा.