गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. यात गडचिरोली-चिमूर मतदासंघाचा समावेश होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा मतदारसंघ आणि त्यात प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे एकीकडे भाजपाला मित्रपक्षातील नेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची साथ तर अंतर्गत नाराजीमुळे काँग्रेस संभ्रमात, अशा एकंदरीत वातावरणात खासदार कोण होणार, ही चर्चा आता सुरू झाली आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभेत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली. काँग्रेसकडून पहिल्यांदाच नामदेव किरसान तर भाजपकडून तिसऱ्यांदा अशोक नेते रिंगणात होते. सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीचा निकाल मतदान यंत्रात कैद झाला. ४ जूनला संपूर्ण लोकसभेचा निकाल लागणार असल्याने गडचिरोलीकरांना सव्वा महिने वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी दोन्ही गटात दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. तुलनेने भाजपच्या गोटात अधिक अस्वस्थता असल्याने पक्षांतर्गत चर्चांना ऊत आला आहे. यंदाच्या निवडणुकीत नेते यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या.

हेही वाचा…नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….

यांच्या व्यतिरिक्त कुणीही मोठा नेता जिल्ह्यात आला नाही. त्यामुळे प्रचाराची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर होती. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आणि एक माजी राज्यमंत्री आहेत. मात्र, प्रचाराला काही दिवस बाकी असताना देखील काही नेत्यांचे रुसवेफुगवे संपले नाहीत, तर दोन आमदार केवळ नावापुरते प्रचारात दिसले. उलट मित्र पक्षातील नेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढत सर्वाधिक सभा व बैठक घेतल्या. पक्षात दोन-दोन आमदार असतानाही नेतेंना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने खिंड लढवावी लागल्याचे चित्र दिसून आले. दुसरीकडे, सत्ताविरोधी लाटेच्या आधार घेत सुरुवातीपासूनच विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसमध्येदेखील शेवटच्या क्षणापर्यंत नाराजीनाट्य सुरू होते.

इकडे सुद्धा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक हाती प्रचाराची धुरा सांभाळत ठिकठिकाणी सभा घेतल्या. प्रचारादरम्यान मंत्री आत्राम आणि वडेट्टीवार यांच्यात झालेल्या वादावादीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मतदानानंतर दोन्ही पक्षाकडून विजयाचा दावा केला जात असला तरी अंतिम निकालासाठी सव्वा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा…मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?

यंदाही ७० टक्के पार?

मागील वेळी गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले होते. यंदाही हा आकडा ७० टक्के पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुर्गम भागातील मतदान यंत्र व आकडेवारी अद्याप मुख्यालयी पोहोचले नसल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आलेली नाही. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ६५ टक्के मतदान झाले आहे. उद्या, रविवारी अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.