सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसंदर्भात भाजपचे निरीक्षक खासदार अनिल बोंडे आणि माजी मंत्री रणजित पाटील यांनी गडचिरोलीत भाजप पदाधिकारी आणि नेत्यांची मते जाणून घेतली. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोली-चिमूरमधून उमेदवारी मिळणार, या बातमीचीच अधिक चर्चा पाहायला मिळाली.

मागील काही महिन्यांपासून गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी महायुतीकडून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आत्राम यांनीही अनेकदा आपण लोकसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, गुरुवारी भाजपचे निरीक्षक खासदार बोंडे आणि माजी मंत्री पाटील गडचिरोलीत आले होते. त्यांनी उमेदवारीबाबत जिल्ह्यातील नेत्यांची मते जाणून घेतली. यावेळी जिल्हाभरातून नेते व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. परंतु यावेळी मंत्री आत्राम यांना भाजपच्या चिन्हावर लोकसभा लढण्याबाबत विचारण्यात आल्याची आणि भाजप गडचिरोलीसाठी उमेदवार बदलणार, अशी चर्चा दिवसभर विविध माध्यमांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे बैठकीला आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुसरीकडे, विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या समर्थकांनी अशा चर्चांमध्ये तथ्य नसून उमेदवारी नेतेंनाच मिळणार, असा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा >>>आमदार गायकवाडांविरुद्धचे शुक्लकाष्ठ थांबेना….पुन्हा नवीन गुन्हा दाखल

अम्ब्रीशराव आत्रामांची पुन्हा दांडी!

जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम याहीवेळी पक्षाच्या बैठकीला गैरहजर होते. मागील काही दिवसांपासून ते पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना सतत गैरहजर असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातही ते दिसले नाही. यामागे त्यांचे काका धर्मरावबाबा आत्राम यांना महायुतीत मिळालेले मंत्रिपद असल्याचे बोलले जाते. अहेरी राजघराण्यातून येणारे अम्ब्रीशराव आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे काका- पुतणे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांना जेव्हापासून मंत्रिपद मिळाले तेव्हापासून अम्ब्रीशराव यांची नाराजी लपलेली नाही. त्यामुळे भाजपामध्ये त्यांच्या अस्तित्वाला धोका असल्याचीही चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp observer mp anil bonde and former minister ranjit deshmukh in gadchiroli for lok sabha ssp 89 amy
Show comments