बुलढाणा : वाघाच्या शिकार संदर्भात केलेल्या विधानावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एका महिलेची शेतजमीन कथितरित्या हडपून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बोराखेडी पोलिसांनी बुधवारी ( दि २८) रात्री उशिरा ही कारवाई केली. यापूर्वी मोताळा न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी गायकवाड, त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणि आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते . मात्र बोराखेडी पोलिसानी टाळाटाळ केली. रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय (नागपूर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.

हेही वाचा…VIDEO : अस्वलाचे कुटुंब मंदिरात आले; पिंडीजवळ थांबले, प्रसाद खाल्ला आणि….

फिर्यादीनुसार, राजूर ( ता मोताळा, जिल्हा बुलढाणा) गावात त्यांची दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड यांनी २१ जुलै २०२१ रोजी या जमिनीवर अतिक्रमण केले. तेथे त्यांनी अवैध फार्म हाऊस बांधले. फिर्यादीने आक्षेप घेतला असता त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. यावर त्यांनी मागील १२ ऑगस्ट २०२१ रोजी बोरखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.

हेही वाचा…“मोदींमुळे बेरोजगार झालेल्या काँग्रेस नेत्यांकडूनच बेरोजगारीवर बोंबाबोंब”, तेजस्वी सूर्या म्हणाले…

त्यामुळे त्यांनी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या अनु.१५६ (३) नुसार कारवाईचे आदेश १७ फेब्रुवारी रोजी दिले. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली.यामुळे अखेर आमदार गायकवाड, मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे, ज्ञानेश्वर वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.