ताडोबा जंगलाला लागून असलेल्या वीज केंद्र परिसरात वाघाच्या जोडगोळीने पुन्हा एकदा दर्शन दिले. ऊर्जानगर, दुर्गापूर व वीज केंद्र परिसरात वाघ व बिबट्याने आतापर्यंत दोन बालकांसह पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यात आता ही व्याघ्र जोडी दिसल्याने परिसरात पुन्हा एकदा भीती व दहशतीचे वातावरण आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल तथा परिसरात वाघ व बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ताडोबा प्रकल्पाचा रस्ता तथा वीज केंद्र, ऊर्जानगर, दुर्गापूर, इरई धरण, पद्मापूर, भटाली परिसरात सातत्याने वाघाचे दर्शन होते.

वनविभाग झाला सतर्क –

शनिवारी रात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाले. वीज केंद्र ते ताडोबा मार्गाला जोडणाऱ्या या भागात वाघाची जोडी आढळली. वर्दळीच्या मार्गावर वाघाच्या जोडीने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. याच भागातून आसपासची गावे व कोळसा खाणीच्या प्रकल्पांकडे जाण्याचा आहे मार्ग. यामुळे वनविभाग सतर्क झाला असून अधिकारी व्याघ्र जोडीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.