विविध गटात विभागलेल्या काँग्रेस नेते विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी एकत्र आल्याचे चित्र रविवारी झालेल्या आढावा बैठकीत दिसून आले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार अ‍ॅड. अभिजीत वंजारी यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी रविवारी शहर काँग्रेस आणि ग्रामीण काँग्रेसची संयुक्त बैठक कुसुमताई वानखेडे सभागृहात घेण्यात आली. एरवी गटातटाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली.

या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री व वर्धा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील केदार, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश सरचिटणीस बबनराव तायवाडे, प्रफुल गुडघे, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे, गिरीश पांडव, तानाजी वनवे, किशोर गजभिये, ग्रामिण कॉग्रेसचे नाना गांवडे, सुरेश भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, एस.क्यू. जमा, विशाल मुत्तेमवार, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक मंचावर उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना विधानसभानिहाय नियोजन करण्याची सूचना केली.

वडेट्टीवार गडचिरोली, चंद्रपूर दौऱ्यावर

राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार दौरा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात  करीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे अ‍ॅड. वंजारी यांच्या प्रचारासाठी ते उद्या गडचिरोलीकडे निघत असून १७ नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्य़ात प्रचार करतील.