गडचिरोली : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक असताना शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसने गडचिरोली – चिमूर लोकसभेसाठी डॉ. नामदेव किरसान यांची उमेदवारी जाहीर करत नव्या चेहऱ्याला संधी दिली. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे ते देखील ऐनवेळी नवा चेहरा पुढे करणार की विद्यमान खासदार अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार. असा प्रश्न महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसमोर पडला आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठे लोकसभाक्षेत्र म्हणून गडचिरोली-चिमूर क्षेत्राची ओळख त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना प्रत्येक भागात पोहोचणे शक्य होत नाही. त्यात यंदा मतदानाला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना शनिवारी रात्री उशिरा महाविकासआघाडीकडून काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीसाठी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासोबत त्यांची रस्सीखेच होती. उच्च विद्याविभूषित असलेले किरसान उत्पादन शुल्क विभागात उपायुक्त होते. २००८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.

हेही वाचा…बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण

दोनदा हुलकावणी मिळाल्यानंतर त्यांना यंदा संधी देण्यात आली आहे. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महायुतीदेखील नवा चेहरा देणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरायला तीन दिवस शिल्लक असून महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे.

खासदार अशोक नेते आपल्यालाच पुन्हा उमेदवारी मिळणार असे ठाम पणे सांगत असले तरी त्यांच्यापुढे मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि संघपरिवारातले डॉ. मिलिंद नरोटे यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळेच नाव घोषित व्हायला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघावी लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ऐन धुळवडीत कुणाचा चेहऱ्याला रंग लागणार आणि कोण बेरंग होणार, याची सर्वत्र उत्सुकता दिसून येत आहे.

हेही वाचा…महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या भेटीने चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष मंगळवारी गडचिरोलीत

भाजपने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नसली तरी मंगळवारी २६ मार्चरोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोलीत येणार आहेत. त्यामुळे महायुतीकडून २६ ला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना याविषयी अधिकची माहिती नसून या दौऱ्याकडे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.