नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्व नागपुरात अधिक देणे अपेक्षित असताना ऐन मतदानाच्या दिवशीचे काँग्रेसचे व्यवस्थापन कमी पडल्याचे दिसून आले. या मतदारसंघाची जबाबदारी आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्याकडे देण्यात आली होती. शिवाय काँग्रसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे याच मतदारसंघाचे रहिवासी आहेत.

गेल्या काही निवडणुकांत पूर्व नागपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मतांची टक्केवारी सातत्याने घटत आहे. या मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ६००७१ मते मिळाली होती तर भाजपला १३५४५१ मते मिळाली होती. त्यापूर्वी म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४७२२६ मते मिळाली होती तर भाजपाने ११२९६८ मते घेतली होती. त्यामुळे मतदारसंघावर काँग्रेसने अधिक लक्ष देणे अपेक्षित होते. या मतदारसंघातून दोनदा विधानसभा निवडणूक लढवलेले आणि विद्यमान विधान परिषद सदस्य ॲड. अभिजीत वंजारी यांच्याकडे या मतदारसंघाचे निवडणुकीचे नियोजन देण्यात आले होते. मात्र, संपूर्ण प्रचारात तसेच मतमोजणीच्या दि‌वशीचे व्यवस्थापन फारसे प्रभावी असल्याचे दिसून आले नाही. काँग्रेसने या मतदारसंघात शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट गाठण्याचे व बुथच्या नियोजनात ढिसाळपणा दाखवला आहे. या मतदारसंघात काही ठिकाणी बुथ नसल्याच्या तक्रारी काँग्रेसशी सहानभूती असणारे मतदार करताना दिसून आले.

हेही वाचा – जिवंत व्यक्ती मृत अन् मृत व्यक्ती जिवंत! चंद्रपुरात मतदार याद्यांचा गोंधळ, नावे नसल्याने मतदार संतप्त

हेही वाचा – बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे या मतदारसंघात राहतात. राष्ट्रवादी फुटण्याआधी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर झाल्या. त्यावेळी नागपुरात सभा घेण्याचे नियोजन असताना अचानक पूर्व नागपुरात ही सभा घेण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी तानाजी वनवे यांना यावेळी बळ दिले होते. परंतु त्यांनीही यानिवडणुकीत प्रभावी प्रचारयंत्रणा राबवल्याचे दिसून येत नाही. पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता देखील याच मतदारसंघात राहतात. त्यांच्याकडून तरी प्रचारयंत्रणा, बुथ नियोजनात सहकार्य करून काँग्रेसच्या बाजूने मतांची टक्केवारी वाढावी यासाठी फारसे प्रयत्न झाले नसल्याचे स्थानिक पदाधिकारी आता सांगू लागले आहेत.