लोकसत्ता टीम

अकोला : पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात ६.२४ टक्क्यांनी जलसाठा कमी आहे. गत वर्षी आजच्या दिवशी अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५०.८७ टक्के जलसाठा होता. यावर्षी मात्र त्यात घट होऊन सध्या ४४.६३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावतीसह पाच जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये गत वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात मोठे प्रकल्पांची संख्या १० असून त्यामध्ये एकूण २९५३.८८ द.ल.घ.मी. पाणी साठ्याची क्षमता आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ९४४.०६ उपयुक्त जलसाठा असून एकूण १५१०.२२ द.ल.घ.मी. जलसाठा उपलब्ध आहे.

आणखी वाचा-नागपूर : मानकापूर चौक ठरतोय ‘ब्लॅक स्पॉट’, दोन उड्डाण पुलांमुळे वाहनांची वर्दळ

एकूण क्षमतेच्या ३९.९४ टक्के हा जलसाठा आहे. गेल्या वर्षी २८ एप्रिलला विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६.५५ टक्के जलसाठा होता. विभागात २५ मध्यम प्रकल्प आहेत. त्याची एकूण क्षमता ७८४.११ द.ल.घ.मी. आहे. सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ३५०.१० द.ल.घ.मी. उपयुक्त व एकूण ४५७.१३ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी ५१.७१ आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मध्यम प्रकल्पांमध्ये ५९.०७ टक्के जलसाठा होता. लघू प्रकल्पांचा विचार करायचा झाल्यास विभागात २२६ प्रकल्प असून त्याची एकूण क्षमता ८११.५९ द.ल.घ.मी. आहे. त्यापैकी ३९०.६२ उपयुक्त जलसाठा असून एकूण ४६८.४४ द.ल.घ.मी. जलसाठा उपलब्ध आहे. लघू प्रकल्पांमध्ये ५३.२३ टक्के जलसाठा असून गेल्या वर्षी ५७.२४ टक्के जलसाठा उपलब्ध होता.

खडकपूर्णामध्ये शुन्य टक्के जलसाठा

अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २४.४६ टक्के, वान ३७.५३ टक्के, अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा ४९.६२ टक्के, बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा शुन्य टक्के, नळगंगा २६.४९ टक्के, पेनटाकळी १६.२१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती ४१.७७ टक्के, बेंबळा ३६.४९ टक्के, इसापूर ४१.६४ टक्के आणि पूस प्रकल्पात ४९.११ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : ‘मायक्रोस्कोप’ चोरी प्रकरण; नव्याने कार्यालयीन चौकशी, तपासावर प्रश्नचिन्ह

मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा कमीच

पश्चिम विदर्भातील मध्यम व लघु प्रकल्पांपेक्षा टक्केवारीमध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मोठ्या प्रकल्पांमध्ये ३९.९४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ५१.७१, तर लघू प्रकल्पांमध्ये ५३.२३ टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षीची तुलना केल्यास पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ९.६१ टक्के, मध्यम ७.३१ टक्के व लघु प्रकल्पांमध्ये ४.०१ टक्के जलसाठा कमी असल्याचे दिसून येत आहे.