अकोला : २०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली. संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच भाजपने लोकसभेत ‘चारशे पार’चे लक्ष्य ठेवल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या कारवायांमध्ये शिक्षा कुणालाच झाली नाही. लोकशाहीऐवजी पोलिसी राज्य मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे २०१४ पासून १५ लाखाहून अधिक कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडले. राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी शंकराचार्यांचा सल्ला ऐकण्यात आला नाही. चारशे पारचा आकड्याची महत्त्वाकांक्षा व त्यातून संविधान बदलण्याचा विचार आदी कारणांमुळे भाजपकडे वळलेला नवीन व सवर्ण वर्ग यांचा संपूर्ण भ्रमनिरास झाला. त्याचा परिणाम म्हणजे मतदानाची टक्केवारी कमी झाली.

हेही वाचा…शरद पवारांनी आधी शेतकरी विधवांची माफी मागावी, गृहमंत्री अमित शाह यांची टीका

शाहू, फुले, आंबेडकर व मानवतावाद स्वीकारणाऱ्या मतदारांवर आता मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही करण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये मतदान न करता भाजपवर राग व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या विरोधात मत व्यक्त करून आपला रोष जाहीर करावा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले. दुसऱ्या टप्प्यात महायुती विरूद्ध वंचित अशीच लढत आहे. या टप्प्यामध्ये मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा…पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान

अमित शहांचे वक्तव्य म्हणजे ‘चोराच्या मनात चांदणे’

‘चोराच्या मनात चांदणे’ अशी म्हण आहे. तेच अमित शहा यांच्या मनात आहे, असा टोला ॲड. आंबेडकरांनी लगावला. गेल्या दहा वर्षांमध्ये संविधान बदलण्याचा त्यांना अधिकार नव्हता. आता ‘चारशे पार’चा आकडा त्याच दृष्टिकोनातून आहे. आरक्षणवाद्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to bjp voters upset and the voting percentage fell said prakash ambedkar ppd 88 psg