गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झालेत. यात तीन महिलांचा समावेश आहे. गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीगडमधील नारायणपूर पोलीस नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीदेखील गोळीबार केला. यात १० नक्षलवादी ठार झाले. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. याशिवाय एके ४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा…बुलढाणा : १८२ गावांत पाणी पेटले! अडीच लाख ग्रामस्थांचे हाल, ५ तालुक्यातील ४६ गावांना टँकरने पाणी पुरवठा

जिल्ह्यात हाय अलर्ट

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सीमावर्ती भागांमध्ये नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असून यंत्रणा सजग झाली आहे.

हेही वाचा…यवतमाळ : दीड वर्षापूर्वीच्या हल्ल्याचा बदला; युवकाला चाकूने भोसकले

मृतांची ओळख पटली नाही

या घटनेतील मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात अद्याप सुरक्षा यंत्रणेला यश आले नाही. यातील काही नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. अबुझमाड जंगलातील नक्षल कारवाईत या सर्वांचा सहभाग असू शकतो असा छत्तीसगड पोलिसांचा कयास आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encounter in abujhmad forest 10 naxalites killed by chhattisgarh police major action ssp 89 psg