आशीष देशमुख यांची मागणी

नागपूर : राज्यातील विद्यापीठांमध्ये गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेने प्रेरित असलेल्या सदस्यांची विविध समित्यांवर निवड झाली आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर असणारे संघ विचारांचे हे सदस्य विद्यापीठांसारख्या पवित्र शिक्षण संस्थांमधील वातावरण दूषित करीत आहेत. त्यामुळे या सर्व सदस्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील विद्यापीठांमध्ये संघ विचारांच्या व्यक्तींचीच कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे, तर विविध प्राधिकरणांवरही तसेच व्यक्ती आहेत. शिवाय अभ्यासमंडळांमध्ये नामनिर्देशित सदस्यांमध्ये याच विचारधारेचे सदस्याची निवड करण्यात आलेली आहे. यामुळे याच विचारधारेतील सदस्य अभ्यासमंडळाच्या अध्यक्षस्थानी निवडून येऊ न त्याच्यांच मताने अभ्यासक्रमात संघ विचारधारेचे अभ्यासक्रम रुजविण्यात येत आहे. या विचारमुळे नव्या पिढीमध्ये मानवी मूल्य रुजवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे येत्या काळात कठीण होणार आहे. केवळ एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांवर दबाव आणून आपल्या विचारधारेवर आधारित उपक्रम आणि योजनाही राबवण्याचे काम या सदस्यांकडून येत आहे. शिवाय यामुळे अभ्यासक्रमात मानवी मूल्ये, खुले विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्तीतून मनुष्याचा विकास होणे शक्य आहे. विद्यापीठ प्रशासनात कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकारी हे सरकारच्या नियंत्रणाखाली काम करीत असून त्यांच्या पगारावर सरकार खर्च करते. त्यामुळे अशाप्रकारच्या नियुक्तया रद्द करण्याच्या उद्देशाने सरकारने पाऊ ल उचलण्याची गरज आहे.