शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी सर्रास कत्तल

नागपूर : राज्यात कोटय़वधी झाडे लावण्याची मोहीम नुकतीच पूर्ण झाली असताना उपराजधानीत मात्र हजारो झाडे तोडण्याची शर्यत सुरू झाली आहे. आतापर्यंत रस्ते आणि मेट्रो प्रकल्पासाठीच झाडे तोडली जात असल्याचे समोर आले होते. मात्र, आता शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्थांच्या उभारणीसाठी देखील  शेकडो झाडे तोडली जात आहेत. गेल्या तीन वर्षांत शहरात चार हजार ९०० हून अधिक झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे. ऑगस्ट २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एक हजार ८१४ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इमारत, रस्ते बांधकाम, मेट्रो, उड्डाणपूल आदी विकासकामांसाठी तीन वर्षांत चार हजार ९०६ झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली. यात शहरात विनापरवाना होणाऱ्या वृक्षतोडीची संख्या मिसळली तर हा आकडा दुप्पट होईल. दुकानांच्या नावाचा फलक दिसत नाही, घराच्या पटांगणात वाहन आणता येत नाही, नवीन फलक लावता येत नाही, अशा नानाविध कारणांसाठी अवैधरित्या वृक्षतोडीची अनेक प्रकरणे गेल्या तीन वर्षांत उघडकीस आली आहेत. पालिकेकडून जेवढी झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली जाते, त्याहून अधिक झाडे तोडली जातात, असाही प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, त्यात कठोर कारवाई होत नसल्याने हा प्रकार वाढत आहे, हेही तेवढेच खरे आहे. व्हीएनआयटीने मागील वर्षी वृक्षतोडीसाठी परवानगी घेतली, पण त्याआधी याच

शैक्षणिक संस्थेत विनापरवाना रस्ते तयार करण्यासाठी ६१ झाडे तोडण्यात आली होती. त्याची तक्रार झाल्यानंतर महापालिकेने त्यावर कारवाई केली. त्या कारवाईचे पुढे काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात ट्रामा केंद्राच्या उभारणीसाठी तब्बल ५०० झाडे तोडण्यात आली. त्यानंतर या परिसरात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरूच आहे. आता दिव्यांगांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया एकाच छताखाली व्हावी याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या क्षयरोग विभागाच्या परिसरात तयार होणाऱ्या आणि दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी ४५० झाडे तोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उद्यान विभागाने केवळ १९४ झाडे तोडण्यात येणार असल्याचे सांगितले आणि तेवढय़ाच वृक्षतोडीसाठी परवानगी दिली असल्याचेही सांगितले.

वृक्षतोडीसाठी परवानगी दिलेले क्षेत्र व झाडांची संख्या

* मध्य रेल्वेचा अजनी परिसर – ५७९

* सक्करदरा शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय – २०६

* मेट्रोचा ऑटोमोटिव्ह चौक ते सीताबर्डी मार्ग – १५२

* मुंजे चौक ते वासुदेवनगर मार्ग – १४६

* नागपूर रेल्वेस्थानक ते प्रजापतीनगर मार्ग – १७९

* राष्ट्रसंत तुकडोजी विभागीय कर्करोग रुग्णालय परिसर-१९४

* व्हीएनआयटी परिसर – १३०

* मेडिकल परिसर – ७८

* पोलीस आयुक्त कार्यालय परिसर – ६०

* ऑटोमोटिव्ह चौक ते कामठी नाका महामार्ग – ४७

व्हीएनआयटीतून सध्यातरी वृक्षतोडीसाठी अर्ज आलेला नाही. ट्रामा केंद्रासाठी मात्र परवानगी मागण्यात आली होती. दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी ४५० नाही तर १९४ झाडे तोडण्याची परवानगी मागण्यात आली. जेवढय़ा वृक्षतोडीची परवानगी मागण्यात आली, तेवढय़ा झाडांवर पालिकेचा उद्यान विभाग खुणा करतो. तेवढीच झाडे तोडली जातात.

– अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका.

लोकसत्ता तगादा : तक्रार गाऱ्हाणे दाद

सर्वसामान्यांना  रोज अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या कुठे मांडाव्यात हा प्रश्नही त्यांना पडतो. त्यांच्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘तक्रार-गाऱ्हाणे-दाद’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या सूचना, तक्रारी, मते loksattavoice@gmail.com या पत्त्यावर पाठवा.