अकोला : वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यातच महावितरणकडून मोसमीपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून ग्राहकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. अकोल्यात सध्या अंगाची लाही-लाही करणारे तापमान आहे.

त्यातच अधून-मधून वादळी वारा सुटण्याचा प्रकार देखील घडतो. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम यंत्रणेवर होतो. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून यंत्रणेवर पडतात. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचा घटनांमध्ये वाढ झाली. त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा…सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, निवृत्तीवेतन आता……

उन्हाळा व त्यानंतर सुरू होणाऱ्या पावसाळ्यात ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणने नियोजन केले. कडक उन्हाच्या झळा झेलत महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. या फांद्या काही ठिकाणी तारांवर घासतात. विद्युत यंत्रणेची क्षती होते. जिल्ह्यातील यंत्रणेची या दॄष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने या फांद्या छाटण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फलक, झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसतो. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. ते वेळीच काढून टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

सैल तार घट्ट करणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले. वीज उपकेंद्रातील रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखण्यावर भर दिला जात आहे. इतरही यंत्रणा सुस्थितीत करण्याचे काम केले जात आहे. यासर्व कामांसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. शिवाय वादळी वाऱ्यामुळे देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात अखंडित वीज पुरवठ्यासाठी नागरिकांनी महावितरण प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा…नशा करी दुर्दशा! मद्याच्या नशेत टॉवरवर चढला अन्…

वाढत्या तापमानात वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहे. वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे. – पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, अकोला.