प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने महापालिकेला तोटा; नितीन गडकरींच्या स्वप्नातील बस संकटात

शहरात पर्यावरणपूरक इथेनॉलवर चालणारी वातानुकूलित ग्रीन बस सेवा सुरू झाली खरी, पण गेल्या दीड वर्षांत या बसला प्रवाशांचा प्रतिसाद नाही. परिणामी,  महापालिकेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बसचे संचालन आता मेट्रोकडे देण्यात येणार असल्याची चिन्हे आहेत. त्या संदर्भातील प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून शहरात चार वर्षांपूर्वी इथेनॉलवर चालणारी ग्रीन बससेवा सुरू करण्यात आली. प्रारंभी पाच बसेस आणि त्यानंतर २५ बसेस शहरात दाखल झाल्या. त्या शहरात धावत आहेत. येणाऱ्या काळात आणखी ३० बसेस येणार आहेत. त्यामुळे  शहरात एकूण ग्रीन ५५ बसेस होतील.

ग्रीन बस तोटय़ात असल्यामुळे महापालिकेच्या परिवहन विभागाने तीन महिने आधी १ रुपयाने बसभाडे कमी केले. तरीही प्रवाशांचा प्रतिसाद नाही. शहरात ५५ ग्रीन बस सुरू केल्या तर त्याला प्रती दिवस ११ हजार लिटर इथेनॉल इंधन लागणार आहे.

सध्या ग्रीन बस चालवणाऱ्या स्कॅनिया कंपनीकडे इतके इंधन साठवण्यासाठी आवश्यक टँक नसल्यामुळे त्यांना इथेनॉलचा साठा करून ठेवणे शक्य नाही.

परिवहन विभागाला ५.०६ कोटींचा फटका

चालू आर्थिक वर्षांत १ मार्च ते ४ जून या कालावधीत या बसवर १३.३४ कोटी रुपये इतके उत्पन्न आणि १९.३० कोटी इतका खर्च झाला आहे. यात परिवहन विभागाला ५.०६ कोटी इतका तोटा सहन करावा लागला. त्यामुळे प्रतिसादाअभावी वेळप्रसंगी ग्रीन बस सेवा बंद करण्यात येऊ शकते अथवा मागणीनुसार त्या चालवल्या जातील, अशी शक्यता परिवहन विभागाने आधीच व्यक्त केली आहे.

ग्रीन बस मेट्रोकडे देण्याचा सध्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा विचार नाही आणि तसा कुठलाही प्रस्ताव नाही. परिवहन विभाग ग्रीन बस चालवण्यास सक्षम असून येणाऱ्या दिवसात शालेय विद्यार्थी, चाकरमाने व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘एक दिवस ग्रीन बस सोबत’ अशी योजना सुरू करण्याचा विचार आहे.    – बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती महापालिका