अनिल कांबळे, लोकसत्ता  

नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलात १७ हजार ४७१ पदांसाठी भरती होत आहे. १७ लाख ७६ हजार युवक-युवतींनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. यामध्ये अभियंते, डॉक्टर, बी-टेक आणि एमबीएची पदवी मिळवणारेसुद्धा आहेत. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल ४१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीतून हा तपशील समोर आला आहे.     

५ मार्चपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. १५ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरातून १७ लाख ७६ हजार युवक- युवतींचे  अर्ज प्राप्त झाले. त्यात पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या ४१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यात अभियंते, डॉक्टर, एमबीए, एलएलबी, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे.  वाढती बेरोजगारी, वाढता उच्चशिक्षितांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे हा टक्का वाढला आहे.

हेही वाचा >>> उद्योग, रोजगाराच्या प्रश्नांमुळे पीछेहाट; उपराजधानीत साधनसंपत्ती असूनही विकास संथगतीने

भरती प्रक्रिया मेअखेर  

१५ एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती. मेअखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडयापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबरअखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता  आहे.

अर्जशुल्कात दिलासा  

शासकीय नोकरीसाठीच्या शुल्काची रक्कम जवळपास एक हजार रुपये  असते. मात्र, पोलीस विभागाने थोडा दिलासा दिला आहे.  खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपये शुल्क आहे.  अर्जाच्या शुल्कातून अंदाजे ७१.४ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत.

१७ हजार ४७१ रिक्त जागांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. आचार संहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. – राजकुमार व्हटकर, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई.