*  केंद्रावर जाण्यास उशीर   *  विद्यार्थी, पालक अस्वस्थ   *   केंद्रावर गर्दी नियंत्रणाची व्यवस्था नाही

अपेक्षेप्रमाणे आज पहिल्याच दिवशी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. शहर बसचा संप, मेट्रो व सिमेंट रस्त्यांची कामे यामुळे ठिकठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे  विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता आले नाही. तासभर आधी निघूनही केंद्राबाहेरच अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येत नाही, या भीतीने रडू कोसळले होते. काही काळ तर पालकही धास्तावले होते. मात्र, अनेक केंद्रांवर मुलांना उशिरा देखील केंद्रावर प्रवेश देऊन त्यांना पेपर देण्यास परवानगी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला.

बारावीसाठी ४५२ परीक्षा केंद्रांवर १ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ऐन परीक्षेच्या एक दिवस आधी शहर बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने आणि  मेट्रो आणि सिमेंट रस्त्यामुळे कोंडी होणार हे अपेक्षित असल्याने विद्यार्थी केंद्रावर वेळेत पोहोचतील किंवा नाही, याबाबत साशंकता होती.  चारचाकी वाहने घेऊन जाणाऱ्या पालकोंना तर याचा फटका अधिक बसला. अजनी रेल्वेस्थानकजवळील तीन केंद्रांवर तर कोंडीची तीव्रता अधिक होती. हिंगणा रोड असो, अंबाझरी मार्ग असो किंवा सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू यासह इतरही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक ठप्प झाली  होती.

शहर बसचा संप, मेट्रोची कामे आणि सिमेंट रस्त्याच्या विकास कामांमुळे अनेक ठिकाणी गर्दी तुंबल्याने विद्यार्थी केंद्रावर पोहचू शकले नाहीत.  खाजगी शिकवणी वर्गात जाता यावे म्हणून शहरांच्या सीमेवरील कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थी प्रवेश घेतात. सर्वच पालक मुलांना दुचाकीने परीक्षा केंद्रांवर पोहचवू शकत नाहीत. विद्यार्थी ऑटो, सायकल आणि  बसने परीक्षा केंद्रावर जातात. मात्र, आज त्यांचे नियोजन बसच्या संपामुळे चुकले. दुसरीकडे ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचाही त्यांना फटका बसला.

पालकांची मानसिकताही कारणीभूत

परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारापुढे होणाऱ्या अनाठायी गर्दीसाठी पालकांची मानसिकताही कारणीभूत ठरली आहे. अनेक पालक थेट प्रवेशद्वारापुढे त्यांची चारचाकी वाहने आणत असल्याने व मुलगा आत जाईपर्यंत उभी ठेवत असल्याने इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

परीक्षा केंद्रावर मुलांना वेळेत पोहोचता यावे म्हणून पालकांनी त्यांच्यासोबत जाणे हे समजण्यासारखे आहे. अनेक पालक केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांची वाहने लांबवर ठेवतात. मुलांना त्यांचा रोलनंबर शोधून दिल्यानंतर बाजूला होतात. मात्र, हे चित्र सार्वत्रिक नाही. अनेक पालक थेट त्याची चारचाकी वाहने केंद्राच्या प्रवेशद्वारापुढेच उभी करतात.

केंद्रावर गर्दी आहे हे दिसत असतानाही ते गर्दीतू वाट काढत त्यांची वानहे पुढे दामटतात. ही बाब चार चाकी वाहनापुरतीच मर्यादित नाही, तर दुचाकी सुद्धा प्रवेशद्वारापुढे किंवा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या करतात. त्यामुळे इतर मुलांना केंद्रावर जाताना अडचणी येतात. अनेक विद्यार्थ्यांसोबत त्याचे आई-वडिलच नव्हे तर भावंडेसुद्धा येतात. एका मुलासोबत चार ते पाच जण येणार त्यामुळे गर्दी वाढते. अलीकडे तर परीक्षा केंद्राला जत्रेचे स्वरूप आले आहे. शहरात रस्ते आणि मेट्रोची कामे आजच सुरू नाही, यामुळे होणारी वाहतूक कोंडीही नवीन नाही. हे सर्व माहिती असूनही आज अनेक पालक त्यांची चारचाकी वाहने घेऊन केंद्रावर आली होती. यामुळेही वाहन कोंडीत भर पडली. याचा सर्वाधिक फटका ब सला तो बस किंवा ऑटोने आलेल्या विद्यार्थ्यांना.

रस्त्याच्या मधोमध उभ्या केलेल्या वाहनांमुळे पेपर सुटल्यावरही वाहन कोंडी होते. प्रत्येक वेळी पोलीस हजर नसतो. शाळा हे  आमचे काम नाही असे सांगून हात झटकते. दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळी होणारा हा प्रकार  यंदा अधिक तीव्रतेने जाणून आला.

हडस, आर.एस. मुंडले

एकाच रांगेत असलेल्या हडस हायस्कूल आणि आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयातही परीक्षा केंद्र होते. या केंद्राजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, या केंद्रासमोरील रस्त्याच्या बाजूचा परिसर मोकळा आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू असले तरी गर्दी होत नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या केंद्राजवळची धुरा मेट्रो प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सांभाळली होती. सकाळी ९.३० ते १०.३० च्या दरम्यान या परिसरात मेट्रोचे कर्मचारी जातीने उपस्थित होते. मेट्रोचे काम जरी सुरू असले तरीही वाहतुकीची प्रचंड कोंडी आणि त्यात विद्यार्थी मात्र अडकले नाहीत, असे हडस हायस्कूलच्या शिक्षिकेने सांगितले.

शिवाजी, धनवटे, न्यू इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना फटका

सर्वाधिक फटका शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धनवटे राष्ट्रीय महाविद्यालय तसेच न्यु इंग्लिश हायस्कूलमध्ये केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. परीक्षेची वेळ, कार्यालयीन वेळ आणि त्याचवेळी अजनी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाडीची वेळ अशा तिहेरी वेळा एकाच वेळेत आल्यामुळे या परिसरातील तिनही केंद्रातील विद्यार्थी अधिक भरडले गेले. तुलनेने दुसरीकडे हडस हायस्कूल, आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरही मेट्रोचे काम सुरू असताना मेट्रो प्रशासनाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना फारशी अडचण गेली नाही. त्याचवेळी धंतोलीतील दीनानाथ हायस्कूलसमोर परीक्षेच्या सुरुवातीला नव्हे तर पेपर सुटल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

गर्दीत अडकले विद्यार्थी

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे आणि सिमेंट रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीचा फटका पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे अनेकांना केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. सक्करदरा भागातील कमला नेहरू महाविद्यालयासमोरील वाहनकोंडीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यास उशीर झाला. पावणेअकरा वाजता महाविद्यालयातील चौकीदाराने प्रवेशद्वार बंद केले होते. उशिरा आलेल्यांना वर्ग शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. हुडकेश्वर भागातील आदर्श विद्यालय आणि कोराडी भागातील कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थी ११ नंतर परीक्षा केंद्रावर आले. विभागीय सचिवांशी संपर्क साधून त्यांना परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. शहरातील मुले त्याठिकाणी ११ व १२वीसाठी जातात. त्यांना  बसचा संप असल्याचे माहिती नव्हते आणि ऑटोची वाट बघता बघता उशीर झाल्याचे सांगण्यात आले. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील  निराला हायस्कूलकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अग्रेसन चौकातून वळसा घेत विद्यार्थ्यांना या परीक्षा केंद्रावर जावे लागले. त्या ठिकाणी चारचाकी वाहने ठेवण्यासाठी जागा नाही. शाळेपासून काही अंतरावर गाडी ठेवत मुलांना आणि त्यांच्या पालकांना केंद्रावर यावे लागले.

अन् विद्यार्थी रडू  लागले

घडय़ाळाचा सरकणारा सेकंद आणि मिनिट काटा समोर सरकत होता, पण गर्दीत अडकलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना समोर सरकता येत नव्हते. सकाळी ९.३० ते ११ यादरम्यान अजनी रेल्वेस्थानकासमोरील शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धनवटे राष्ट्रीय महाविद्यालय आणि न्यु इंग्लिश हायस्कूल या परीक्षा केंद्र परिसरातील हे दृश्य  होते. मेट्रोच्या कामामुळे अजनी रेल्वे स्थानकासमोरील हा रस्ता मोठय़ा वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. परीक्षा असल्याने या रस्त्यावरील कठडे दूर करण्यात आले, पण समोरचा रस्ता बंद होता. विद्यार्थी आणि पालकांसाठी खुला करण्यात आलेल्या या रस्त्याने सामान्य नागरिकही शिरले. त्यातच शिवाजी विज्ञान महाविद्यालयासमोर प्रचंड मोठा खड्डा मेट्रोने खणून ठेवला आहे. त्यामुळे वाहतूक प्रचंड जाम झाली. घडय़ाळाच्या सरकणाऱ्या काटय़ाबरोबर विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, तर पाच ते २० मिनिटे उशिरा पोहोचल्याने पालकांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. शेवटी परीक्षा प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. धनवटे राष्ट्रीय महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाविद्यालयातूनच त्यांच्या केंद्राकडे मार्गक्रमण केले.

‘‘हडस हायस्कूलसमोरही विकासकामे सुरू आहेत. मुलांना त्रास नको म्हणून पालक थेट शाळेच्या फाटकापर्यंत चारचाकी गाडी घेऊन जातात पण, त्यामुळे वाहतूक तुंबून जाते. माझ्या मुलाला हडस शाळा परीक्षा केंद्र असल्याने मी सेंट्रल मॉलमध्ये चारचाकी पार्क केली. तेथून मुलगा परीक्षा द्यायला गेला. आज स्टार बसचा संप असल्याने शहरामध्ये वाहतूक कोंडी  झाली नाही मात्र, उद्यापासून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ’’

      – प्रा. सुनील भट, व्हीएनआयटी

‘‘शहरांतील परिस्थितीचा आढावा घेऊन पालकांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आणून सोडावे, असे आवाहन वारंवार करूनही पालक ऐकत नाहीत. तुरळक विद्यार्थी वेळेत केंद्रांवर जाऊ शकले नाहीत. मात्र, बहुतेक विद्यार्थ्यांनी १०.३० पर्यंत परीक्षा केंद्र गाठले होते. कालच मेट्रोच्या लोकांना बोलावून त्यांना बारावीच्या परीक्षा केंद्रांची माहिती देऊन सहकार्य करण्याविषयी सांगितले गेले. आज पहिलाच दिवस असल्याने थोडी गैरसोय झाली असली तरी नागपूर विभागात परीक्षा व्यवस्थित पार पडली.’’

      – श्रीराम चव्हाण,

प्रभारी विभागीय सचिव, नागपूर विभागीय शिक्षण मंडळ