अमरावती : उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासारखा खोटारडा माणूस महाराष्‍ट्राच्‍या इतिहासात झालेला नाही. पुत्रप्रेम हे काय असते, हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्‍याबाबतीत अनेकवेळा दिसून आले आहे. कल्‍याण डोंबिवली मतदार संघामध्‍ये गोपाळ लांडगे या कडवट शिवसैनिकाची तिकीट कापून तेव्‍हा राजकारणातही नसलेल्‍या श्रीकांत शिंदे यांच्‍या उमेदवारीसाठी हट्ट धरणे याला पुत्रप्रेम म्‍हणतात, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्‍यास करून बोलावे, असा सल्‍ला देखील त्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटी पक्षाकडे दुर्लक्ष केले. एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणांमध्‍ये अडकविण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍यामुळे त्‍यांचा पक्ष फुटला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्‍यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्‍हणाले, जेव्‍हा गोपाळ लांडगे यांना उमेदवारी देण्‍यात आली होते, तेव्‍हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्‍याकडे आले होते. श्रीकांत शिंदे यांच्‍या उमेदवारीसाठी हट्ट धरला. तेव्‍हा तर श्रीकांत शिंदे राजकारणात, समाजकारणातही नव्‍हते. एका कट्टर शिवसैनिकाचे तिकीट कापून उमेदवारी मिळवणे याला काय म्‍हणतात, हे महाराष्‍ट्राला ठाऊक आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा…एस.टी.बसेसवर शिवसेनेच्या जाहिराती ! आचारसंहितेचा भंग; काँग्रेसची आयोगाकडे तक्रार

आज देशातील लोकांना गुलाम बनवण्यात आले आहे, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगभर देशाची अप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पुलवामा सारखा भयंकर प्रकार राजकारणासाठी घडविण्यात आले. मात्र यावेळी असे होणार नाही. महाराष्ट्रावर सर्वांचे लक्ष आहे. आम्ही ज्या भाजपसोबत मैत्री आणि युती केली होती तो अटल बिहारी वाजपेयी यांचा भाजप होता. आता मात्र तो पक्ष कुठेही नाही. हा नरेंद्र मोदी यांचा पक्ष आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा भाजप आणि आता या मोदींच्या पक्षात बराच मोठा फरक असल्याचे खासदार संजय राऊत म्‍हणाले.

हेही वाचा…यवतमाळ : शिवसेना (उबाठा)चे संजय देशमुखांवर खोटी माहिती दिल्याचा आरोप

आतापर्यंत अमरावतीमध्ये देखावे झाले, नाचगाणे झाले, नृत्याचे कार्यक्रम झालेत, थापेबाजी झाली, दंगली घडवल्या, मात्र त्याचा काहीही परिणाम अमरावतीच्या मतदारांवर होईल असे मला वाटत नाही. अमरावती सारखेच चित्र संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातले आहे. यामुळेच करोना काळात ज्याप्रमाणे जनतेने ‘गो करोना गो’चे नारे दिले होते, त्याच प्रकारे आता जनता ‘गो मोदी गो’ चा निर्णय घेणार असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati sanjay raut criticise devendra fadnavis ekanth shinde and dr shrikant shinde mma 73 psg