गडचिरोली : देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक बेबंदशाही, अविवेकी सामाजिकता, अशी आव्हाने उभी ठाकली आहेत. देशात वाढती राजकीय अस्थिरता, एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात तरुणांमध्ये संभ्रम आणि नकारात्मकता वाढीला लागली आहे. मात्र, याचे फारसे प्रतिबिंब समकालीन साहित्यात उमटताना दिसत नाही. आदिवासीबहुल भागातील नवलेखकांनी स्वतःच्या जाणीवा शब्दबद्ध करणे महत्त्वाचे असून गोंडवाना विद्यापीठानेही त्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तरुणाईच्या मुस्कटदाबीला संवैधानिक मार्गानेच उत्तरे दिली पाहिजे, असे आवाहन युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ. किशोर कवठे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीद्वारा स्थानिक सुमानंद सभागृहात आयोजित दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे आज, बुधवारी उद्घाटन पार पडले. सकाळी ९ ते १० वाजतापर्यंत ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. उद्घाटन सत्राला संमेलनाध्यक्ष डॉ. कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उद्घाटक व सत्कारमूर्ती ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, जागतिक साहित्याचे अभ्यासक प्रा. ज्ञानेश्वर गटकर, बांबू प्रशिक्षक मीनाक्षी वाळके, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

हेही वाचा : चंद्रपूर : पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात दास्तांगोईचे सादरीकरण मुंबईचे अक्षय शिंपी व नेहा कुळकर्णी यांनी केले. ‘माडिया व गोंडी भाषा साहित्याचे संवर्धन’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. पत्रकार राजेश मडावी, माडीया व गोंडी भाषेचे अभ्यासक नंदकिशोर नैताम, सोनाली मडावी यांनी भाषा संवर्धनाच्या अंगाने मांडणी केली. तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.सविता गोविंदवार, संचालन संशोधक करीश्मा राखुंडे तर आभार सहायक प्रा.अमोल चव्हाण यांनी मानले.

जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज

आजच्या युवकांपुढे बरीच आव्हाने आहेत. काळ झपाट्याने बदलत आहे. रंजनवादी साहित्यापलीकडे आता जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज असल्याचे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. परंपरा आणि नवतेची सांगड नवलेखकांनी घालणे, समजून घेणे व त्यातून साहित्य निर्मिती करण्याचे आवाहन डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.

हेही वाचा : ‘आमच्या गावात विकसित भारत संकल्प यात्रा नको’, ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव चर्चेत

युवा साहित्यिकांना व्यासपीठ देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध

युवा साहित्य संमेलन गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आयोजित करणे हा नवा अनुभव आहे. पुढील काळात युवा साहित्य संमेलनाची परंपरा कायम ठेवली जाईल. गोंडवना परिसरातील नव्या पिढीतील लेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन देणार असून विद्यापीठ यासाठी कटिबद्ध आहे, असे मत स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli inauguration of yuva sahitya sammelan dr kishor kavthe appeal to youth ssp 89 css
First published on: 21-02-2024 at 19:29 IST