अकोला : शेयर मार्केटमधून पाच ते दहा हजार नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका वयोवृद्ध डॉक्टरची तब्बल ६४.५० लाख रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

डॉक्टरने पैसे परत मागितल्यावर आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत दोन कोटी ६० लाखांची मागणी केली. याप्रकरणी सायबर शाखेने नऊ बँकांसोबत संपर्क साधत एक कोटी ८७ लाख रुपये गोठवले आहे.

हेही वाचा – सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

विविध माध्यमांतून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रामुख्याने वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून लुटल्याचे प्रकार घडत आहेत. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिदिवस पाच ते दहा हजार रुपये नफा कमावून देतो, असे फोन वरून शहरातील डॉ. जयंतीलाल दुल्लभजी वाघेला (७६) यांना आमिष देण्यात आले. या फोन कॉलला बळी पडत वाघेला यांनी ट्रेडिंग खाते उघडले. कोडच्या माध्यमातून विविध बँक खात्यांमध्ये एनईएफटी, आरटीजीएसद्वारे ६४ लाख ५० हजार पाठविले. त्यानंतर तक्रारदार डॉ. वाघेला यांना गुंतवणुकीबाबत परतावा न मिळाल्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींना रक्कम परत मागितली असता, त्यांनी डॉ. वाघेला यांना ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा

आणखी दोन कोटी ६० लाख रुपयांची मागणी केली. डॉ. वाघेला यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तक्रारदाराचे पैसे वळती केलेल्या बँक खात्याची माहिती घेतली. वेगवेगळ्या राज्यातील एकूण नऊ बँकेसोबत पत्रव्यवहार केला. त्या १४ बँक खात्यांमधील १.८७ कोटी रुपये गोठवले आहेत.