इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि भटके विमुक्त प्रवर्गाच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कुठलीच मदत केली जात नसल्याने ‘महाज्योती’च्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र नियमित आर्थिक मदत केली जात असताना महाज्योतीचा कारभार संथ का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘बार्टी’ने अनुसूचित जातीच्या यूपीएससी पूर्वपरीक्षा-२०२० मधील उत्तीर्ण १२२ विद्यार्थ्यांना तर ‘सारथी’कडून कुणबी व मराठा प्रवर्गातील २३३ विद्यार्थ्यांना यूपीएससी मुख्य २०२० शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ५० हजार रुपये एकरकमी मदत करण्यात आली. यासाठी ‘बार्टी’ने ६१ लाख रुपये तर  ‘सारथी’ने १ कोटी १६ लाख ५० हजार रुपये खर्च केले. याआधारे विद्यार्थ्यांनी दिल्लीत मुख्य परीक्षेसाठी योग्य ते प्रशिक्षण घेऊन घवघवीत यश संपादन केले. हीच मागणी इतर मागासवर्ग, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थी मागील वर्षापासून ‘महाज्योती’कडे वारंवार करीत आहेत.

परंतु, ‘महाज्योती’ प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे ओबीसी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. बार्टी आणि सारथीने आता यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून दिल्ली येथे निवास भत्ता म्हणून २५ हजार रुपयांची मदत दिली आहे.

मागासवर्ग प्रवर्गातील अनेक विद्यार्थी आर्थिक स्थितीमुळे महागडी शिकवणी लावू शकत नाही. परिणामी, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा अशा परीक्षांमधील उत्तीर्ण होण्याचा टक्काही कमी आहे. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी ‘महाज्योती’ची स्थापना करण्यात आली. मात्र योग्य नियोजन आणि दूरदृष्टीच्या अभावाने मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेकडून कुठलाही लाभ मिळत नसल्याने विद्यमान सरकारविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

थोडी माहिती…

‘बार्टी’कडून अनुसूचित जाती तर ‘सारथी’कडून कुणबी, मराठा समाजातील ‘यूपीएससी’ पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी ५० हजार रुपये तर मुलाखतीसाठी २५ हजार रुपयांची मदत केली जाते.

राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसींच्या पदरी कायम निराशाच आली आहे. महाज्योतीची स्थापना करूनही विद्यार्थ्यांना लाभ  मिळत नाही. यूपीएससी पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीर्ण ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना महाज्योती कधी न्याय देणार?

– खेमेंद्र कटरे,  मार्गदर्शक, ओबीसी संघर्ष समिती