अकोला : न्यायप्रविष्ट प्रकरणातील शेतीवर बळजबरी ताबा घेण्याला विरोध करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार व त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना १७ मे रोजी अकोला जिल्ह्यातील मनब्दा गावात घडली. या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमातून आता प्रसारित झाली.

शेतकरी गतमने व भांबेरी येथील सावकार शेळके यांच्यातील शेतीच्या वादाचे प्रकरण अकोट न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. परंतु, शेळके यांनी दमदाटी करत शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न १७ मे रोजी केला. सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्रफितीमध्ये दिसून येते.

हेही वाचा…स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला कडाडून विरोध! नागपुरात विविध संघटना व पक्षांची बैठक

त्यांचे वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ल्या करण्यात आला आहे. त्यामध्ये ते जखमी झाले. कुटुंबातील महिलांनी देखील हल्ल्याला विरोध केला. या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून सावकार आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकारच्या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध सावकारीचा फास शेतकऱ्यांभोवती आवळला जात आहे. नैसर्गिक संकट व उत्पादित शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांवर अवैध सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. वेळेत कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्यास अवैध सावकारीतून जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकार देखील वाढले आहेत.

हेही वाचा…राज्यात हिवतापामुळे तिघांचा मृत्यू, बृहन्मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

…तर करा सहकार विभागाकडे तक्रार

अवैध सावकारीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अंतर्गत छापेमारीची कारवाई सहकार विभागाकडून केली जाते. सहकारी संस्थेच्या कार्यालयामार्फत आतापर्यंत अवैध सावकारी अंतर्गत बळकावलेली एकूण १५०.३३ हे. आर शेतजमीन व ४९३९.५० चौ. फूट जागा तसेच एक राहता फ्लॅट संबंधितांना परत करण्यात आला आहे. आजपर्यंत १९७ प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३३ अवैध सावकारांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून २१ प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.