यवतमाळ : जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून आतापर्यंत जिल्ह्यातील १७ गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी चारजणांविरुद्ध ही कारवाई करून पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर जिल्हादंडाधिकार्‍यांनी सदर आदेश पारीत केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवधूतवाडी हद्दीतील सचिन उर्फ येडा छगन राठोड (२५, रा. जामनकरनगर), पवन संतोष काकडे (२७, रा. आदिवासी सोसायटी), यवतमाळ शहर हद्दीतील इरफान अली उर्फ इरफान लेंडी सय्यद बरकत अली (४३, रा. अशोकनगर), बाभूळगाव पोलीस ठाणे हद्दीतील वैभव उर्फ जहरीला अंबादास जांभुळगर (२२,रा. बाभूळगाव), अशी एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मुखवटे लावून ओबीसी आंदोलकांचे मुंडन

जिल्ह्यात शरीर, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करून दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी ठाणेदारांना दिले होते. विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनयम १९८१ अन्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव ठाणेदारांनी तयार करून पोलीस अधीक्षकांच्या मार्फत मंजुरीसाठी जिल्हादंडाधिकार्‍यांकडे सादर केला होता. या चारही प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. या कारवाईमुळे आतापर्यंत एकूण १७ जणांविरुद्ध एमपीडीएचा बडगा उगारण्यात आला आहे.

हेही वाचा – बाह्ययंत्रणेमार्फत शिक्षक भरतीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध; सरकारने पुनर्विचार करावा : आमदार अडबाले

जिल्ह्यातील शांतता भंग करणारे, शरीर व संपत्तीविरुद्ध गुन्हे करणारे, वाळू तस्कर, दारूविषयक गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यासाठी माहिती गोळा करणे सुरू असून, भविष्यात अनेक गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpda against four criminals in yavatmal district nrp 78 ssb