नागपूर: उपराजधानीतील एका ऑटोरिक्षा चालकाने बुधवारी एका शाळकरी विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे केल्याची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली. ही विकृती ठेचून काढण्यासाठी या ऑटोरिक्षा चालकावर कठोर कारवाई करा, अशी मागणी खुद्द विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनकडून केली गेली.

फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर म्हणाले, विकृत ऑटोरिक्षा चालकाने केलेल्या कृत्याची चित्रफीत पुढे आल्यावर पोलिसांनी आटोरिक्षा चालकाला अटक केली. या ऑटोरिक्षा चालकाद्वारे केलेले हे कृत्य अत्यंत निंदाजनक आणि संतापजनक आहे. समाजातील या पद्धतीची वाईट विकृती ठेचून काढण्यासाठी या ऑटोरिक्षा चालकावर कठोर कारवाई करावी. त्याने स्वत:च्या व्यवसायाप्रती अप्रामाणिकपणा दाखवला. त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी फेडरेशनकडून करण्यात आली. पालक ऑटोरिक्षा चालकावर विश्वास ठेवून पाल्यांना ऑटोरिक्षाने शाळेत पाठवतात. या विश्वासाला तडे जाऊ न देण्याचे काम ऑटोरिक्षा चालकाचे असते. परंतु या विकृत मानसिकतेच्या काही ऑटोरिक्षा चालकांमुळे सर्वच ऑटोरिक्षा चालकांवर अविश्वास येऊ शकतो. तेव्हा आपला व्यवसाय हा प्रामाणिकपणे करावा असेही भालेकर म्हणाले.

हेही वाचा – आनंदवार्ता ! वैद्यकीय शाखेत नवीन अभ्यासक्रम, पदव्युत्तर जागांमध्येही होणार वाढ

पालकांनीही ऑटोरिक्षा चालकाची चौकशी करावी

नागपुरातील पालकांनी ऑटोरिक्षा चालकाची पूर्ण चौकशी केल्यावरच त्यांची सेवा घ्यावी. या प्रकरणासह इतरही या पद्धतीच्या गंभीर प्रकरणाची पालकांसह नागरिकांनीही खुल्या मनाने तक्रार करण्याची गरज आहे. अन्यथा या पद्धतीचे विकृत लोक आणखी गुन्हे करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, अशीही भिती भालेकर यांनी वर्तवली.

हेही वाचा – विदर्भात १५ ते २८ मे दरम्यान शून्य सावली दिवस

ऑटोरिक्षा चालकांनी व्यवसायाशी प्रामाणिक रहावे

नागपुरातील बहुतांश ऑटोरिक्षा चालक चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजावत आहे. ऑटोरिक्षा चालकांनीही आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनानेही शहरात चालणाऱ्या अवैध ऑटोरिक्षा वाहतुकीवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांची ने – आण करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांची सर्व माहिती स्वत:कडे ठेवावी. जेणेकरून भविष्यात या पद्धतीची घटना घडणार नाही, असेही भालेकर म्हणाले.