नागपूर : झेंडा चौकात दाम्पत्यासह चिमुकलीला चिरडणारा चालक गांजाच्या नशेत होता, अशी माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आली आहे. गांजाच्या नशेमुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातातीतल तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारमध्ये गांजा सापडल्यामुळे पोलिसांनी एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सन्नी सुरेंद्र चव्हाण (३७, कापलावस्ती, इमामवाडा), अंशुल विजय ढाले (२४, जाततरोडी) आणि आकाश नरेंद्र महेरुलिया (गवळीपुरा, कामठी) अशी आरोपींची नावे आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड केली आणि एकाला जबर मारहाणही केली. सचिन सूर्यभान सुभेदार (३७, शिवाजीनगर, महाल) हे पत्नी व ३ महिन्यांच्या मुलीसह दुचाकीने जात होते. झेंडा चौकात सन्नी चव्हाण याने तिघांनाही जबर धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Video: वाघिणीचा चार बछड्यांसह जलविहार; नवेगाव-नागझिऱ्यातील या व्हिडिओने लावले वेड

कारमधील सन्नी चव्हाणला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. आकाश नरेंद्र महेरुलिया आणि अंशुल ढाले हे पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली. कारमधील तिनही तरुण मद्य आणि गांजाच्या नशेत होते. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ही माहिती समोर आली. आरोपीच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि ३२ ग्रॅम गांजा, चिलम पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी एनडीपीएस ॲक्टनुसारही गुन्हा दाखल केला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गोरख भामरे म्हणाले, ‘रात्री साडेआठच्या सुमारास एका वेगवान कारने कोतवाली पोलीस स्टेशनच्या झेंडा चौक परिसरात कारने तिघांना धडक दिली. लोकांनी एका आरोपीला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि गांजा जप्त करण्यात आला.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली, टीटीईंवर आता तीन डब्यांऐवजी…

कोतवाली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुण्यातील कल्याणीनगरमधील अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दोघांना चिरडल्याचे प्रकरण ताजे आहे. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही अल्पवयीन मुलाला लवकर जामीन मिळाला. तसेच त्याला विशेष वागणूक मिळाल्याने जनतेत संतापाची लाट उसळली. या अपघातानंतर दारू पिऊन वाहने चालविणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत आहे. ही घटना घडल्याच्या काही दिवसांत नागपुरातही भरधाव कारने तिघांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे कोतवाली पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur driver who hit family had taken ganja adk 83 ssb
Show comments