नागपूर : उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करण्यासाठी माणसे जलतरण तलावाचा आधार घेतात आणि म्हणूनच उन्हाळ्यात जलतरण तलावावर प्रचंड गर्दी आढळते. वन्यप्राण्यांसाठी जंगलातील पाणवठे हाच त्यांचा जलतरण तलाव असतो. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात अगदी जलतरण तलावाच्या आकाराचा पाणवठा आहे आणि या पाणवठ्यात ‘टी-४’ ही वाघीण तिच्या चार बछड्यांसह गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जलविहार करताना दिसत आहे. या व्याघ्रप्रकल्पाचे पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी हा त्यांचा जलविहार चित्रीत केला आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प हे एकेकाळी भारतातले एकमेव जंगल होते, ज्याठिकाणी वीज नव्हती. त्यामुळे खरे जंगल अनुभवायचे तर नागझिऱ्यातच. रात्रीच्या अंधारात एका छोट्याश्या किटकापासून तर वाघापर्यंतचा आवाज अगदी स्पष्ट आणि चंद्राच्या प्रकाशातली त्यांची चाहूल स्पष्टपणे अनुभवता येत होती. कदाचित याच नैसर्गिक वातावरणामुळे या अभयारण्यात वाघांची संख्याही चांगलीच होती. त्याकाळात वाघांची जननी अशीही या जंगलाची ओळख होती. मात्र, दशकभरापूर्वी या अभयारण्यात बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना कदाचित येथील नैसर्गिक वातावरण मानवले नाही. त्यांनी सौर उर्जेवर आधारित प्रकाशयंत्रणा सुरू केली आणि या जंगलाचे ग्रहच फिरले. येथे वाघ जन्म तर घेत होता, पण मोठा होताच तो जंगलाकडे पाठ फिरवून दुसरीकडे जात होता. ‘जय’ हा वाघ याच जंगलातला, पण त्यानेही उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याची वाट पकडली. तो तेथूनही रहस्यमयरित्या बेपत्ता झाला तो कायमचा हा भाग वेगळा. आता पुन्हा एकदा या जंगलाला सुगीचे दिवस आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील येथे वाघ सोडण्यात आलेच, पण इथला वाघ देखील येथेच स्थिरावू लागला आहे.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली, टीटीईंवर आता तीन डब्यांऐवजी…

नागझिऱ्यात ‘टी-४’ नावाच्या वाघिणीला ‘टी-९’ या वाघापासून चार बछडे झाले. यात दोन नर तर दोन मादी बछड्यांचा समावेश आहे. विदर्भात सूर्य प्रचंड आग ओकत आहे. एकीकडे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरातच वातानुकूलीत यंत्रणेचा वापर करुन ते कसेबसे या उष्णता आणि उकाड्यापासून स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर जंगलातल्या प्राण्यांना मात्र पाणवठ्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच नैसर्गिक असो वा कृत्रिम पाणवठे. अंगाची लाहीलाही होत असताना दाह शांत करण्यासाठी ते या पाणवठ्याचा वापर करत आहेत.

हेही वाचा – सावधान ! वाशिममध्ये डेंग्यू, चिकनगुनियाची साथ; १६१ संशयीतांपैकी…

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात पाच पर्यटन प्रवेशद्वार आहेत. नागझिरा हे सर्वात जुने पर्यटन प्रवेशद्वार आहे. तर गोंदिया जिल्ह्यातून प्रवेशासाठी मंगेझरी, चोरखामारा आणि भंडारा जिल्ह्यातून पिटेझरी हे प्रवेशद्वार आहे. चोरखामारा आणि पिटेझरी येथून १४ पर्यटक वाहनांना प्रवेश दिला जातो. गेल्या १५ दिवसांपासून ‘टी-४’ ही वाघीण तिच्या चार शावकांसह घाटमारा प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर असलेल्या पाणवठ्यावर सातत्याने दिसून येत आहे. पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी या वाघिणीचा बछड्यांसह पाणवठ्यातील विहार चित्रीत केला आहे.