१२० टँकर बंद; जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठय़ाची सोय

नागपूर : शहराच्या सीमावर्ती भागात जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठय़ाची सोय झाल्याने महापालिकेने संबंधित भागातील १२० टँकर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून दर महिन्याला १० ते १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय शहरातील टँकर लॉबीला लगाम घालणारा आहे.

शहरात विविध वस्त्यांमध्ये वर्षभर टँकर धावतात. काही ठिकाणी खरच गरज असताना तर काही ठिकाणी महापालिकेतील टँकर लॉबीचा दबाव यासाठी कारणीभूत असतो. त्याला लगाम घालण्याचे प्रयत्न आतापर्यंत एकाही सत्ताधाऱ्यांनी केले नव्हते. प्रथमच मुंढे  यांनी ज्या ठिकाणी टँकरची गरज नाही अशा वस्त्यांमधील तब्बल  १२० टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराच्या सीमावर्ती भागांसह ज्या भागात जलवाहिन्या नाही अशा वस्त्यांमध्ये वर्षभर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या स्थितीत शहरात एकूण ३४६ टँकर्स सुरू होते. यावर दरवर्षी २८ कोटी रुपये खर्च होत होते. या भागात जलवाहिन्यांचे नेटवर्क तयार झाले. नळ जोडण्याही देण्यात आल्या.

सुधार प्रन्यासने लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज या भागात तसेच आशीनगर व मंगळवारी झोनमधील ८७६ लेआऊटमध्ये जलवाहिन्यांचे काम पूर्ण केले. तेथे सुमारे १७ हजार नळ जोडण्या दिल्या. हुडकेश्वर-नरसाळा भागात शासकीय निधीतून जलकुंभ बांधण्यात आले व तेथून सुमारे ८८४० नळ जोडण्या देण्यात आल्या. हुडकेश्वर-नरसाळा भागामध्ये रोज ७६ टँकर्सच्या ५३० फेऱ्या होत होत्या. मार्च २०२० अखेरीस संपूर्ण हुडकेश्वर नरसाळा टँकरमुक्त करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे.

आणखी १०० टँकर्स कमी होणार

लवकरच आणखी १०० टँकर्स बंद करण्याचा महापालिकेचा मानस आहे. वांजरा येथील जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर कामठी मार्गावरील उप्पलवाडी, शिवनगर, धम्मदीपनगर, डायमंडनगर, हस्तीनापूर, बंधू सोसायटी, भीमवाडी आदी भागातील नागरिकांना नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. यामुळे या भागातील टँकर्सच्या ६० ते ७० फेऱ्या कमी होतील. याशिवाय नारा व कळमना भागातील जलकुंभाचे काम झाल्यावर तेथील टँकरही बंद केले जाणार आहेत.

थांबवलेली विकास कामे सुरू न करण्यावर प्रशासन ठाम

कार्यादेश देऊन थांबवण्यात आलेली महापालिकेची विकास कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी सभागृहात प्रशासनाला दिले आहेत. मात्र आयुक्तांकडून जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत कामे सुरू न करण्यावर अधिकारी ठाम आहेत. दरम्यान, आज गुरुवारी बैठकीत आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांच्या या वादात अधिकाऱ्यांची  चांगलीच अडचण झाल्याचे चित्र होते.  सत्ताधारी सदस्यांनी कामांवरील स्थगिती उठवा, असा ठराव महापालिका सभेत पारित करून मुंढे यांना आव्हान दिले होते. सभागृहाच्या ठरावावर मुंढे आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते.

सभा होऊन आठ दिवसानंतर गुरुवारच्या विविध विकास कामांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. जोपर्यंत आयुक्तांकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही विकास कामांबाबत निर्णय घेणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

त्यामुळे येत्या दिवसात विकास कामे थांबवण्याच्या विषयावरून  पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.