तिरपुडे इस्टिटय़ूटकडून जनमत चाचणी
महाराष्ट्रात सुरुवातीला महापालिकेत वार्ड पद्धत त्यानंतर प्रभाग पद्धत अस्तित्वात आली. २००६ साली प्रभाग पद्धत बंद करून परत वार्ड पद्धत सुरू केली आणि आता ऑगस्ट २०१६ मध्ये होणाऱ्या नगरपालिका व महापालिका स्तरावर पुन्हा प्रभाग पद्धत होऊ घातली आहे. यात चार वार्डाचा एक प्रभाग तयार केला गेला आहे. यासंदर्भात राजकारणी व जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी ‘तिरपुडे इन्स्टिटटय़ूट ऑफ सोशल अॅक्शन अॅन्ड रिसर्च’तर्फे १६ ते २२ मे या कालावधित पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य नागपुरातील जनतेकडून नगरपालिका व महापालिका येथे वॉर्ड पद्धती वा प्रभागपद्धतीविषयी जनमत चाचणी घेण्यात आली. यात ४३ विद्यार्थी व १५ प्राध्यापकांनी मिळून एकूण ८,०५९ नागरिकांची मते जाणून घेतली. या जनमत चाचणीत तीन प्रश्न विचारण्यात आले होते.
महापालिका निवडणूक ही वार्ड पद्धतीने व्हावी की प्रभाग पद्धतीने याविषयी एकूण ८०५९ नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार सर्वाधिक ७०.२७ टक्के उत्तरदात्यांनी वार्ड पद्धती असावी, असे मत व्यक्त केले. तर १७.१५ टक्के उत्तरदात्यांनी प्रभाग पद्धती असावी असे म्हटले आहे.
याविषयी काहीही सांगता येत नाही, असे म्हणणाऱ्या उत्तरदात्यांची संख्या ही १२.५४ टक्के असल्याचे दिसून येते. यावरून महापालिकेत वार्ड पद्धतीच अधिक सोयीस्कर व लोकाभिमुख असल्याचे सिद्ध झाले. चांगल्या कार्यकर्त्यांला कामाची संधी ही वार्डात मिळेल वा प्रभागात याविषयी सर्वाधिक ७१.४४ टक्के उत्तरदात्यांनी चांगल्या कार्यकर्त्यांला कामाची संधी ही वार्डातच मिळू शकते, असे मत व्यक्त केले. तर याउलट १७.३७ टक्के उत्तरदात्यांनी प्रभागपद्धती असावी, असा कल दिला. याउलट ११.१९ टक्के उत्तरदात्यांनी यासंदर्भात काहीही सांगता येत नाही, असे म्हटले आहे. यावरून सध्याच्या महापालिका निवडणुकीत वार्ड पद्धतीच असावी असे दिसून आले. लोकांची कामे वार्डात चांगली होतात की प्रभागात, यासंदर्भात विचारले असता सर्वाधिक ६९.८६ टक्के उत्तरदात्यांनी अशाप्रकारची लोकांची कामे वार्डातच चांगली होतात, असे म्हटले आहे. तर १५.०९ टक्के उत्तरदात्यांनी याविषयी यासंदर्भात प्रभाग पद्धतीत लोकांची कामे चांगली होतात, असे मत व्यक्त केले. याउलट सारख्याच प्रमाणात म्हणजे १५.०९ टक्के उत्तरदात्यांनी याविषयी काहीही सांगता येत नाही, असे मत व्यक्त केले.
महापालिका प्रभागापेक्षा वार्डाला लोकांचा कल या तिन्ही प्रश्नांच्या उत्तरावरून अधिक दिसून आला. कारण वार्डाच्या चांगल्या कार्यकर्त्यांला कामाची संधी मिळून त्या वार्डातील लोकांची कामे ही चांगल्याप्रकारे करता येतील, अशाप्रकारचा संदेश या जनमत चाचणीवरून दिसून आला.
ही जनमत चाचणी राजकुमार तिरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. केशव पाटील, प्रा. सचिन हुंगे आणि प्रा. रोशन गजबे यांनी केले.