नागपूर : नागपूरमधील रूफटॉप रेस्टॉरेंटला असलेला वादळाचा धोका लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेबाबत तसेच वैधतेबाबत तपासणी करावी, अशी मागणी होऊ लागली. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले आहेत.

शहरातील ४० हून अधिक रूफ टॉप रेस्टॉरेंट व बार सुरू आहेत. याबाबतीत त्यांना परवानगी नाही किंवा संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबईतील जाहिरात फलक कोसळण्याच्या घटनेमुळे सरकार खडबडून जागे झाले. उंच फलक तपासणी सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ‘रूफ-टाॅप’ रेस्टॉरेंटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याकडे सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी महापालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. प्रश्नाची गांभीर्यता लक्षात घेऊन या निवेदनाची दखल घेत रूफटॉप रेस्टॉरेंटच्या परवाना व तत्सम बाबींची तपासणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले, असे दडवे यांनी कळवले आहे.

हेही वाचा – अनैतिक संबंधाच्या संशयातून आईनेच घेतला मुलीचा जीव

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या इमारतींवर, हॉटेल्सवर रूफ-टॉप रेस्टॉरेंट आहेत. तेथे रात्रीच्या वेळी ग्राहकांची मोठी गर्दी असते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे वादळी वाऱ्याचा धोका येथे उद्भवू शकतो. या रेस्टॉरेंटमध्ये सौंदर्यीकरणाच्या नावाखाली काही तात्पुर्ते बांधकाम, लोखंडी कठडे उभारण्यात आले आहे. हवेमुळे ते कोसळू शकतात. अचानक वादळ आले तर तातडीने ग्राहकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची सोय येथे नाही. त्यामुळे तेथील ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेची तपासणी करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर

दरम्यान महापालिकेने आत्तापर्यंत पाचशेहून अधिक उंच जाहिरात फलकांची तपासणी केली असून त्यापैकी पाच अनधिकृत फलकांवर कारवाई केली आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी चारशे फलक अनधिकृत असून त्यात रेल्वेच्या जागेवरील २०० फलकांचा समावेश असल्याचा दावा करीत त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिकेने याबाबत रेल्वेला पत्रही पाठवले आहे. त्याच प्रमाणे भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनीही महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून इमारतींवर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. चौकाचौकातील उंच इमारतींवर अशा प्रकारचे फलक असून वादळामुळे ते कोसळल्यास मनुष्याच्या जीवितहानीचा धोका उत्पन्न होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यांनी मोबाईल टॉवर्सच्या सुरक्षिततेचाही मुद्दा उपस्थित केला आहे. नागपूरमध्ये विधिमंडळाच्या दर हिवाळी अधिवेशनात सर्व प्रमुख रस्त्यांवर नेत्यांचे उंच फलक लावले जाते. चौकाचौकात सिग्नलवरही अशा प्रकारचे फलक लावले जाते. महापालिकेकडून त्यावर कारवाई केली जाते, उच्च न्यायालयानेही रस्त्यावर फलक लावण्यास मनाई केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिकेकडून होणारी कारवाई दंडात्मक स्वरुपाची असल्याने दंड भरून फलक लावणारे मोकळे होतात ही स्थिती आहे.