नागपूर : पतीचे इतर तरुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने भांडण केले. रागाच्या भरात स्वतःच्या तीन वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह घेऊन ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि मुलीचा खून केल्याची कबुली दिली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आईवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विंकल रामा राऊत (२४, रा. एस ४४, बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी, एमआयडीसी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. रियांशी रामा राऊत (३) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आरोपी महिला ट्विंकल ही रामा लक्ष्मण राऊत (२४, रा.एस ४४, बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी एमआयडीसी) याच्यासोबत २०२० पासून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहते. दोघेही बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी एमआयडीसीत काम करतात. त्यांना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी रियांशी नावाची चिमुकली झाली. परंतु, ट्विंकल आणि रामा हे नेहमीच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊन आपसात भांडण करायचे. सोमवारी ट्विंकल आणि रामा दोघेही सकाळी ८ वाजता कंपनीत कामाला गेले. कंपनीतून दुपारी १२ ते ३ दरम्यान रामा बाहेर गेला. ट्विंकलला संशय आल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यामुळे रामा घरी झोपी गेला. ट्विंकल दुपारी ३.३० वाजता आपली चिमुकली रियांशीला घेऊन घराबाहेर पडली. दोन तास मुलीसह फिरत होती.

हेही वाचा – सोन्याच्या दरात बदल, हे आहेत आजचे दर…

झाडाखाली दाबला मुलीचा गळा

ट्विंकलच्या आई वडिलाचे निधन झाले असून ती स्वत:च्या बळावर जगत होती. रामासोबत संसार थाटल्यानंतर तिला मुलगी झाली. वारंवार वाद होत असल्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी मुलीला संपवण्याचा विचार तिच्या मनात आला. त्यातून तिने मुलीचा एका झाडाखाली गळा दाबून खून केला. तासाभरानंतर तिला पश्चाताप झाला, स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय बदलला. ती मृत मुलीला कडेवर घेऊन फिरत होती.

हेही वाचा – बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर

स्वत:च पोहोचली पोलीस ठाण्यात

ट्विंकलने काही जणांना मुलीचा जीव घेतल्याची बाब सांगितली. मुलीचा अंत्यसंस्कार करण्याचे तिने ठरविले. मात्र, तिला कुणीही मदत केली नाही. त्यानंतर ती एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे निघाली. रस्त्यातच तिला पोलिसांची गाडी दिसली. तिने गाडीला हात दाखवून थांबवले. पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. ट्विंकलला पोलिसांनी ठाण्यात आणले. मुलीला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. या प्रकरणी रामाच्या तक्रारीवरून एमआयडीसीचे ठाणेदार प्रवीण काळे यांच्या आदेशाने ट्विंकलवर खुनाचा गुन्हा दाखल केला

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mother murder daughter on suspicion of an immoral relationship adk 83 ssb