उपचाराचे अधिक पैसे घेण्याच्या १५० तक्रारी

नागपूर :  करोना काळात शासनाच्या दिशानिर्देशानुसार शुल्क न घेता शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात रुग्णांकडून जास्तीचे लाखो रुपये वसूल करण्यात आले. ही लूट केलेल्या खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत ६६ लाख रुपये देण्यात आले. पण अद्याप खाजगी रुग्णालयांनी दीड कोटी रुपये महापालिकेने आदेश देऊनही रुग्णांना परत केले नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांवर आता महापालिकेच्यावतीने कारवाई केली जाणार आहे.

सुमारे दीड महिन्यापूर्वी शहरात करोना रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात खाटा नव्हत्या. अनेक बाधितांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्याचा फायदा घेत खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या दिशानिर्देशानुसार शुल्क न घेता रुग्णांकडून तपासणी, डॉक्टरांचे शुल्क व उपचाराच्या नावाखाली २ ते ६ लाख रुपयापर्यंतचे बिल देत रुग्णांची अक्षरश: लूट केली. या संदर्भात महापालिकेकडे २५०च्यावर तक्रारी आलेल्या आहेत.

बाधितांवर उपचार करणाऱ्या खासजी रुग्णांलयांनी शासनाच्या दरापेक्षा अधिक दराने देयक आकारणी केली अशा रुग्णालयांमध्ये सेव्हन स्टार, विवेका, एलेक्सिस, वोक्हार्टसह चार ते पाच या रुग्णालयाचा समावेश आहे. ज्यांच्यावर कारवाई केली, अशा जादा आकारणी केलेल्या काही निवडक रुग्णालयांनी ६६ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम परत केली. तरी अद्याप आठ रुग्णालयांनी दीड कोटीवर घेण्यात आलेले जादा शुल्क अजूनही परत केले नाही.

खासगी रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांपैकी  ४१६२ बिलांचे अंकेक्षण महापालिकेने केले. खासगी रुग्णालयांत उपलब्ध खाटांपैकी ८० टक्के खाटा शासनाने जारी केलेल्या दरसूचीनुसार आरक्षित असतात तर २० टक्के खाटांवर रुग्णालय त्यांच्या दराने बिलाची आकारणी करू शकते. तरीही काही रुग्णालयांनी ८० टक्के खाटांवर दाखल रुग्णालयांकडून जादा दराने बिलाची आकारणी केल्याचे अंकेक्षण अहवालात लक्षात आले. ७५३ देयकांमधून सुमारे एक कोटी ९१ लाख ४५ हजार ६५५ रुपये खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा आकारल्याचे अंकेक्षण अहवालातून समोर आले. ही रक्कम रुग्णालयांनी संबंधित रुग्णांना तातडीने परत द्यावी, असे आदेश केवळ ६६ लाख ५५ हजार ९५७ रुपये रुग्णालयांनी रुग्णांना परत असून उर्वरित दीड कोटी रुपये अजूनही परत केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

ज्या खाजगी रुग्णालयांना जादा शुल्क घेण्याबाबत नोटीस देण्यात आली होती, त्यातील बहुतांश रुग्णालयांनी पैसे परत केले आहे. तरी अजूनही काही रुग्णालयांनी शुल्क परत केले नाही. अशा रुग्णालय व्यवस्थापनांना पुन्हा एकदा समज देत नंतर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

– जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.