नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांचा ओघ जसा वाढत आहे, तसेच या प्रकल्पात प्लास्टिकच्या पाण्याचा बाटल्या आढळण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. कित्येकदा वाघांच्या तोंडात प्लास्टिकच्या बाटल्या आढळल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी चक्क वाघाने त्याच्या नैसर्गिक पाणवठ्यातून प्लास्टिकची पिण्याच्या पाण्याची बाटली बाहेर काढली. एक जबाबदार वन्यजीवप्रेमीने काढलेला हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरला आणि त्यावर प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ पाहून मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलासुद्धा राहवले नाही. त्याने हा व्हिडीओ “एक्स” या समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. यात सचिन तेंडुलकर म्हणतो, “वाघीण स्वतःच्या तोंडाने तलावातील प्लॅस्टिक उचलताना दिसते. यातून आपणही शिकायला हवे की, निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आपलीही आहे. आपल्या पृथ्वीचे रक्षण आपणच केले पाहिजे.”

हेही वाचा – नागपुरात २३ हजारांवर नागरिकांचे वाहन चालवण्याचे परवाने निलंबित; कारण काय? जाणून घ्या…

तेंडुलकरसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प अतिशय आवडीचा व्याघ्रप्रकल्प आहे. वर्षातून किमान दोनदातरी तो ताडोबात येतो. ताडोबाचे गाभाच नाही तर बफर क्षेत्रातही तो पर्यटन करतो. कधी मित्रांसोबत, ते कधी कुटुंबियांसोबत. “जुनाबाई” या वाघिणीच्या तीनही पिढ्या त्याने पाहिल्या आहेत आणि यासंदर्भातसुद्धा त्याने “एक्स” वरून माहिती दिली. ताडोबाच्या अनेक गोष्टी तो समाजमाध्यमांवर पोस्ट करत असतो. या व्हिडीओमुळे सचिनदेखील स्तब्ध झाला आणि त्याने अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून “एक्स” वर संदेश टाकला. वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा ताडोबा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आधी प्लास्टिकच्या बाटल्यांशी वाघ खेळताना आढळून आला होता. आता त्याच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाचा बछडा रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराच्या ‘गमबुटा’शी खेळताना आढळला. त्यानंतर तो मजुराच्या कपड्याशी खेळताना आढळला आणि आता तो पाणी पिण्यासाठी गेला असताना त्यातून चक्क पाण्याची प्लास्टिकची बाटली घेऊन बाहेर आला. निमढेला बफर क्षेत्रात भानूसखिंडी या प्रसिद्ध वाघिणीचा मादी बछडा असलेली नयनतारा तिच्या डोळ्यांमुळे सतत चर्चेत आहे. तीच्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांनीच तिचे नामकरण नयनतारा असे केले. काही दिवसांपूर्वी ती जांभूळडोह परिसरातील सिमेंट बंधारा परिसरात दिसली. ती पाणी पिण्यासाठी गेली, पण यावेळी त्या पाण्यातून चक्क तिच्या तोंडाला पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बाटली लागली आणि मग पाणी न पिता ती चक्क ती बाटली घेऊन बाहेर आली. हे दृश्य वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले. प्रशासनाने प्लास्टिक व कचरामुक्त व्याघ्रप्रकल्प ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पर्यटकांचा ओघ अधिक असलेल्या या व्याघ्रप्रकल्पात कधी प्लास्टिक बाटल्या तर कधी प्लास्टिकचे वेष्टण आढळतच आहेत. मे २०२३ मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात बबली या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. मुंबई येथील डॉक्टर राहुल महादार यांनी ही छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली होती.

हेही वाचा – शिवाजी महाराजांना बहुजनांपासून दूर करण्याचे कट कारस्थान, अभिनेता किरण माने यांचे मत

डिसेंबर २०२० मध्ये जुनाबाई वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना आढळून आले, जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघिणीचा बछडा प्लास्टिक बाटली उचलतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावर आले होते, बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढाही इकडेच आहे. बछडे मोठे होत असताना त्यांना कोणत्याही नव्या गोष्टींची उत्सुकता असते. अशावेळी बाटल्या किंवा तत्सम वस्तू त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar was shocked to see a plastic bottle in the tiger mouth rgc 76 ssb
Show comments