Premium

बंदी असतानाही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री, अकोल्यात महिलेचा पाय…

नॉयलॉन मांजाचा जीवघेणा फास आत्तापासून आवळला जात आहे. नॉयलॉन मांजावर बंदी असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास त्याची विक्री केली जाते.

Nylon Manja Akola
बंदी असतानाही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री, अकोल्यात महिलेचा पाय… (प्रातिनिधिक छायाचित्र)

अकोला : नॉयलॉन मांजाचा जीवघेणा फास आत्तापासून आवळला जात आहे. नॉयलॉन मांजावर बंदी असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास त्याची विक्री केली जाते. शहरात एका महिलेचा पाय नॉयलॉन मांजामुळे कापला गेला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. प्रशासन लक्ष देऊन नॉयलॉन मांजाची विक्री थांबवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर संक्रांती सव्वा महिन्यावर आल्याने मुलांसह तरुणांमध्ये पतंगोत्सवाचा उत्साह संचारला आहे. मुले व तरुण पतंग उडवण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. पतंग उडवताना बहुतांश नॉयलॉन मांजाचा वापर करीत आहेत. हा नॉयलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर उठला. बंदी असतानाही बाजारपेठेत नॉयलॉन मांजा विक्रीसाठी येतोच कसा? असा प्रश्न निर्माण होतो.

हेही वाचा – फडणवीस यांच्याकडील खात्याच्या पोलिसांवर भुजबळ नाराज, म्हणाले…

महसूल, पोलीस प्रशासन ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरात रस्त्यावर पडलेल्या मांजात पाय अडकून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गीता नगर परिसरात घडली. मांजामुळे महिलेच्या पायाला खोलवर जखम झाली असून, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. गीता नगर परिसरातील महेश कॉलनी येथे राहणाऱ्या नीता काबरा (५०) शिकवणी वर्गाला गेलेल्या त्यांच्या नातीला घरी आणण्यासाठी जात होत्या. मुख्य रस्ता पार करत असताना रस्त्याच्याकडेला पडलेल्या नॉयलॉन मांजात त्यांचा डावा पाय अडकला. त्याचवेळी तेथून जात असलेल्या दुचाकीत या मांजाची दुसरी बाजू अडकली. दुचाकीमुळे मांजा खेचल्या गेल्याने त्यांच्या पायाला जोरदार झटका बसून खोलवर जखम झाली. पायाच्या नस कापल्या गेल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांचा पाय मांजाच्या फासातून सोडवत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तोवर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.

हेही वाचा – बुलढाणा मतदारसंघासाठी ५१ कोटींचा निधी, न्यायाधीशांची निवासस्थाने, रस्ते कामांना मिळणार गती

त्यांच्या पायाच्या जखमेवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. नॉयलॉन मांजामुळे या प्रकारच्या गंभीर घटना होण्यास सुरुवात झाली असून प्रशासनाने वेळीच नॉयलॉन मांजाची विक्री रोखण्याची गरज आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sale of nylon manja despite ban woman injured in akola ppd 88 ssb

First published on: 08-12-2023 at 13:36 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा