अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्र झळांसोबतच भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७० टक्के कामे अद्यापही कागदावरच आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

जिल्ह्यात दरवर्षीचा उन्हाळा हा पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थांचे तर चांगलेच हाल होतांना दिसतात. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. तापत्या उन्हाच्या पाऱ्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे खोळंबल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. खारपाणपट्ट्यात ज्या भागात पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नाही, त्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक गावात बैलगाडी, सायकल, ऑटोमधून पिण्याचे पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे.

हेही वाचा >>>ट्रॅफिक सिग्नलवर ‘ग्रीननेट’ची सावली, नागपूरकरांचा उन्हापासून…

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. त्यामध्ये २३८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या विविध ५५० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यातील १४९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची १६० कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांकडून प्राप्त होत असलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जाते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, प्रस्तावित उपाययोजनांच्या ८९ गावांध्ये अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे त्या गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी सुद्धा ग्रामस्थांना दुरून आणावे लागते. निम्मा उन्हाळा उलटला तरी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी, ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>>तुम्ही शेतात सोयाबीन पेरलीये…? ‘अमरवेल’मुळे १०० टक्के नुकसान……..

विकतच्या पाण्याचा आधार

शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागात देखीत विकतच्या पाण्यावर तहान भागवली जात असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात टँकरचे पाणी विकत घेतले जात आहे. घरगुती स्वरूपात दैनंदिन वापरासाठी विकतच्या कॅनच्या पाण्याचा आधार घेतला जात असून पाणीटंचाईची गंभीर स्थिती आहे.

धरणांमधील पाणीसाठ्यात घट

अकोला जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने जलसाठ्यात घट झाली. काटेपूर्णा, वान आदी धरणांमधील पाणीसाठा कमी झाला. त्याचा विपरीत परिणाम पाणीपुरवठा योजनांवर होत आहे.