भंडारा : आयपीएल प्रमाणेच निवडणूक काळातही सट्टा बाजार आणि बुकी सक्रिय होतात. सध्या लोकसभा निवडणुकीतील हालचालींवर सट्टा बाजारातील बुकींनी लक्ष केंद्रित केले आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होईल, असा बुकींचा अंदाज आहे. सट्टा बाजारात आज शनिवारी मेंढेंचा भाव ५५ तर डॉ. पडोळेंचा भाव ६५ असा आहे. मात्र मोठ्या बुकींनी अजूनही याबाबत गुप्तता बाळगली असून रात्रीपर्यंत ते भाव उघड करतील असे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री मतदानाची अंतिम टक्केवारी उशिरा आल्याने सट्टेबाजांनी सायंकाळपर्यंत भाव उघडले नव्हते. त्यामुळे आज शनिवारी जोरदार उलाढाल होणार असल्याचे सट्टा बाजारातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दि. १९ एप्रिल रोजी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. मतदानानंतर कोणता उमेदवार बाजी मारणार, कोण किती मतांच्या फरकाने विजयी होणार, कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणता उमेदवार मताधिक्य मिळविणार, एक्झीट पोल काय आहे, यावर आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यातच सट्टा बाजार आणि बुकीही सक्रिय झाले असून आपली पोळी भाजून घेण्यासाठी सट्टेबाजांकडून निकालाबाबत अंदाज लावण्यात येत आहेत. त्यासाठी आतापर्यंत होणाऱ्या प्रत्येक सभा, बैठक, रॅली याकडे सट्टेबाज लक्ष ठेवून होते. शहरी आणि ग्रामीण भागात कोणत्या उमेदवाराला किती प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे.

हेही वाचा – देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले

सट्टेबाजाराचे महत्वाचे वैशिष्टे म्हणजे ज्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता असते, त्याच्यावर सर्वांत कमी पैसे लावले जातात. अर्थात जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जादा भाव सट्टेबाजांकडून दिला जातो. यानुसार गुरुवारी मतदानापूर्वी सट्टा बाजारात भाजप उमेदवार सुनील मेंढे यांचा दर ५५ पैसे तर डॉ. पडोळे यांचा दर १.२० रुपये होता. मात्र २४ तासांत यात मोठा बदल झाला असून आज शनिवारी मेंढेंचा भाव ५५ आणि पडोळेंचा भाव ६५ इतका झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचाच अर्थ दोघांध्ये सध्या अटीतटीची लढत दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील मतदारांचा कौल अद्यापही पूर्णपणे मिळालेला नसल्याने यात पुन्हा मोठ्या फरकाने बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय मोठ्या बुकींनी अजूनही त्यांचे भाव उघडलेले नाहीत. सहसा मतदानाची आकडेवारी येताच बुकी भाव जाहीर करतात मात्र यावेळी मोठ्या बुकींनी याबाबत कमालीची गुप्तता बाळगली असून आज रात्री उशिरापर्यंत मोठ्या बुकिंकडून भाव उघडले जातील आणि त्यानंतर यात आणखी तफावत दिसेल असे सांगण्यात येत आहे.

खरे तर सट्टे बाजार म्हणजे निव्वळ अनिश्चितता. सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा माहोल असला तरी सट्टे बाजारातील बुकींनी लोकसभा निवडणुकीला प्राथमिकता दिली आहे. सध्या भंडारा गोंदिया मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सट्टबाजांनी मेंढे यांच्यावर सर्वात कमी पैसे लावून त्यांच्या विजयाची शक्यता वर्तविली असली तरी डॉ. पडोळे हॉट फेव्हरेट ठरू शकतात असे सट्टा बाजारातील सूत्रांचे म्हणणे आहे. इतर उमेदवारांबद्दल मात्र बुकी फारसे उत्साही नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल मतदान संपल्यानंतर कोण बाजी मारणार यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोणता उमेदवार बाजी मारणार आणि कोणता पक्ष सत्तेवर येणार याबाबतचा अटीतटीचा जुगार रंगू लागला आहे.

हेही वाचा – पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….

भंडारा गोंदिया लोकसभेच्या रिंगणात १८ उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात थेट लढत होती. त्या दोन्ही उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांची रॅली आणि सभा दोन्ही जिल्ह्यात झाल्या. मतदानापूर्वी आणि मतदानानंतर या मतदारसंघातील सट्टेबाजार तेजीत आला आहे. आज मोठी उलथापालथ होणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी सट्टे बाजारात क्षणाक्षणाला बुकींचे निर्णय बदलतात. त्यामुळे कोणाचा भाव बदलणार आणि कोण आघाडी घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदानाची अंतिम टक्केवारी ६४.७२ टक्के आहे. यात भंडारा – ६४.५५ टक्के, गोंदिया – ६१.४१ टक्के, साकोली – ६८.९८ टक्के, तुमसर – ६३.५१ टक्के, तिरोडा – ६१.१० टक्के, अर्जुनी मोरगाव – ६८.७९ टक्के अशी ६ वाजतापर्यंत मतदानाची सरासरी आकडेवारी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speculation markets boom after polls how much rate on candidates in bhandara gondia ksn 82 ssb